भाविक व गणेशभक्तांमध्ये उत्साह
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सद्यस्थितीत कोरोनाची लाट ओसरत असताना व रुग्णसंख्या घटत असल्याने राज्य सरकारने गुरुवार पासून मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला. पाली बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करणार्यांनाच बाप्पाचे दर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे खूप काळ प्रतीक्षा केल्यानंतर मंदिरे खुली होणार असल्याने भाविकामध्ये उत्साह दिसून येत आहे.
यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय धारप म्हणाले की, मंदिर परिसरात प्रवेश करताच हॅण्ड सॅनिटयार व थर्मल स्कॅनिंग होत आहे. प्रत्येक भाविकाला मास्क अनिवार्य असणार आहे. सभामंडपात प्रत्येक भाविकांमध्ये अंतरासाठी सहा फुटांवर गोल सर्कल करण्यात आले आहेत. यामध्ये बसूनच भाविक दर्शन घेत आहेत. कुठेही गर्दी किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देवस्थान ट्रस्टचे सुरक्षारक्षक बंदोबस्ताकरिता तैनात आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनी शासन नियमांचे पालन करून ट्रस्टला सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष अॅड.धनंजय धारप यांनी केले आहे.