आवासच्या समुद्र किनारी बैलगाडीचा थरार

हाशिवरेचे विनोद पाटील ठरले फायनल सम्राट

| खारेपाट | प्रतिनिधी |

आवास येथे क्षात्रैक्य कृषक महोत्सवानिमित्त स्व. श्रीनिवास बाळाराम भगत यांच्या स्मरणार्थ बैलगाडी, घोडागाडी स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत शेकडो बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी आवास येथील समुद्र किनारी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. या स्पर्धेत फायनलमध्ये हाशिवरे येथील विनोद पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

दरम्यान या स्पर्धेत फायनलमध्ये द्वितीय क्रमांक चिन्मय नागावकर- वायशेत व तृतीय क्रमांक विराज श्रीनिवास भगत- आवास यांनी पटकाविला. सेमी फायनल प्रथम क्रमांक गौरी भरावडे- काशिद, द्वितीय क्रमांक कै. पुंडलिका संसारे- झिराड, तृतीय क्रमांक स्वरूपा माळी- तळवळी यांनी मिळविला. तर कॉटर फायनलमध्ये प्रथम क्रमांक अभिजीत महाळुंगे- धोकवडे, द्वितीय क्रमांक अन्वेष माळी- गोंधळपाडा आणि तृतीय क्रमांक क्रमांक अमोल कोतवाल- नांदगाव यांनी पटकाविला. या बैलगाडी स्पर्धेत सुमारे पाच गट खेळवण्यात आले. तसेच घोडा गाडी स्पर्धेतही अनेक घोडा गाडी स्पर्धकांनी भाग घेतला होता.

सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आवास ग्रामपंचायत सरपंच अभिजीत राणे, रणजीत राणे व आवास परिसरातील बैलगाडी शर्यतप्रेमींनी मेहनत घेतली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी सरपंच अभिजीत राणे, रणजीत राणे, प्रदीप नाईक, द्वारकानाथ नाईक, अमित नाईक, आवास परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन बाणा हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी केले. तसेच मान्यवरांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version