| रेवदंडा | प्रतिनिधी |
प्रतिवर्षा प्रमाणे एकविरा मातेचा नारळाची ओटी भरण्याच्या निमित्ताने आयोजित पारंपारिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीचा थरार कुंडलिका समुद्र खाडीत असंख्य इंजिन होड्यांच्या जत्रौत्सवाने संपन्न झाला. या स्पर्धेत आग्राव येथील गुरूदास कामत यांची हिरावती शिडवाल्या होंडीने प्रथम क्रमांक तर आग्राव मधील हरिश्चंद्र शेट्टी यांच्या हिरकणी शिडवाल्या होंडीने व्दितीय क्रमांक पटकाविला. तर कोर्लई मधील कमलावती शिडवाली होडी तृतीय व पद्मावती शिडवाली होडी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरल्या.
गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी प्रतिवर्षा प्रमाणे आग्राव दर्यातंरग मित्रमंडळ पुर्वापाडा आयोजीत शिडवाल्या होंडयाची जंगी शर्यतीचा थरार आग्राव जेटी येथून दुपारी बारा वाजता सुरू झाला. या वर्षी एकूण आठ शिडवाल्या होड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता, तर सोबतीला असंख्य इंजिन होड्या स्थानिक कोळी बांधव व भगिनीसह पै-पाहूण्यासह कुंडलिका समुद्र खाडीत होत्या, जणूकाही इंजिन होड्यांचा जत्रौत्सव कुंडलिका समुद्र खाडीत साकारला होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे शिडवाली होडीस 1 लाख रूपये व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 55 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास 35 हजार रूपये व भव्य चषक तर चतुर्थ क्रमांकास उत्तेजनार्थ बक्षिसे मान्यवरांचे हस्ते सायकांळी सहाचे बक्षिस वितरण करण्यात आले. या स्पर्धेत हिरकणी, हिरावती, वसुंधरा, कमलावती, पद्मावती, लक्ष्मी, जयवंती, व महालक्ष्मी या शिडवाल्या होड्यांनी सहभाग घेतला होता. तर मोठ्या संख्येने इंजिन होड्यांनी कुंडलिका समुद्र खाडी गजबजून गेली होती.






