नेरळ येथे बर्निंग कारचा थरार

| नेरळ | वार्ताहर ।

माथेरान घाटाच्या पायथ्याशी नेरळ येथे स्कॉरपियो गाडी आगीत भस्मसात झाली. सुदैवाने त्यातील तिघेजण वाचले आहेत. अग्निशमन दलाची गाडी उशिरा दाखल झाल्याने येथील अग्निशमन यंत्रणेचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेरळ राजेंद्र गुरूनगर येथे राहणारा तुषार सानप हा तरुण अन्य दोन मित्रांसोबत आपली स्कॉर्पिओ कारने माथेरान घाट फिरण्यासाठी गेला होता. प्रजासत्ताक दिनाच्या संध्येला साडेसात वाजण्याच्या सुमारास घाट उतरून नेरळच्या दिशेने येत असताना कारच्या इंजिनमधून धूर निघण्यास सुरुवात झाली. तुषारने कार कर्जत बाजूकडील चढावावर लावून मित्रांसह बाहेर पडला. कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. कार तुलसी निसर्ग इमारती समोरील राज्यमार्गावर जळत असल्याने या राज्य मार्गावर धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच तात्काळ नेरळ पोलीस हजर झाले. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने नेरळ पोलिसांनी दोन्ही बाजूकडील वाहने थांबवल्याने राज्यमार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. वाहनाला लागलेली आग विझवण्यासाठी कर्जत नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनाला प्राचारण करण्यात आले होते, परंतु कर्जत-नेरळ यामधील अंतर जास्त असल्याने नेरळ पोलिसांनी पर्यायी मार्ग म्हणून पाण्याचा टँकर बोलावले, तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अन्य काही साहित्याचा वापर देखील स्थानिक तरुणांनी व पोलिसांनी केला. परंतु, आग मोठ्या प्रमाणात लागल्याने कार पूर्णतः जळून राख झाली. पाण्याच्या टँकरने नंतर आग विझविण्यात पोलिसांना व स्थानिकांना यश आले. रस्त्याच्या मधोमध जळालेली कार जेसीबीच्या साह्याने बाजूला करून दोन्ही बाजूच्या वाहनांना रस्ता मोकळा करण्यात आला.

एकूणच नेरळ शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत असताना अग्निशमन वाहनांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेरळ शहरात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. कर्जत आणि माथेरान या ठिकाणी अग्निशमन वाहन आहे परंतु येथील वाहन नेरळमध्ये दाखल होईपर्यंत उशीर होतो. नेरळ शहरात एखाद्या इमारतीला आग लागल्यास संबंधीत यंत्रणा काय उपाय योजना करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version