। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान आणि परिसरात गेले तीन दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नेरळ-माथेरान घाटात धुक्याची दुलई दिसून येत आहे. नेरळ-माथेरान घाटातील धुकेमय वातावरणामुळे येथे आलेले पर्यटक आनंदी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार वार्यासह पाऊस आला. हा अवकाळी पाऊस संध्याकाळी चार वाजल्यापासून पुन्हा सुरू झाला. त्या पावसामुळे नेरळ-माथेरान घाट रस्त्यात सर्वत्र धुक्याची दुलई पसरली होती. या धुक्यामुळे नेरळ-माथेरान घाटातील झाडांमधून अंगावर येणारे धुके अनुभवण्यासाठी हौशी पर्यटक या घाटात सैर करू लागले आहेत. त्याचवेळी त्या धुक्यातून ये-जा करणार्या वाहनांना गाडीच्या लाईट चालू करूनच प्रवास करावा लागत होता. तर, दुचाकीस्वार देखील धुक्यातून वाहने चालविण्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान, सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी नेरळ-माथेरान घाटात निर्माण झालेली धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसून येत होती..