। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात सलग दुसर्या दिवशीही वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना गर्मीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, या अनपेक्षित पावसामुळे शेतकर्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका हा जांभूळ व आंबा पिकांना बसला आहे. विट व्यवसायिकांची देखील एकच तारांबळ उडाली असून काही ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच, झाडे उन्मळून पडली असून घरावरील कौलं व पत्रे उडाल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे हिरावल्या गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या नुकसानीची दखल घेऊन मदत देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.