फिफा स्पर्धेतील काही सामने आयोजनासाठी प्रयत्न
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑलिंपिक या क्रीडा महोत्सवाच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्यात आल्यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉलच्या विश्वकरंडकातील काही लढतींच्या आयोजनासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून (एआयएफएफ) प्रयत्न करण्यात येत आहेत. सौदी येथे 2034 मध्ये फिफा विश्वकरंडक आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही लढती भारतात खेळवण्यासाठी कंबर कसली आहे, अशी माहिती एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी दिली.
2034 मधील विश्वकरंडकाच्या आयोजनासाठी सौदी अरेबिया या एकमेव देशाचा प्रस्ताव फिफाकडे आला होता. आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडूनही सौदी अरेबियाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. एआयएफएफकडून सौदी अरेबियाला आयोजनासाठी पाठिंबा देण्यात आला. अखेर फिफाकडून सौदी अरेबियाला विश्वकरंडकाच्या आयोजनाचा मान देण्यात आला.
48 संघ व 104 सामने 2034 मध्ये सौदी अरेबिया येथे विश्वकरंडक होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये जगभरातून 48 देशांचा सहभाग असणार आहे. तसेच संघ वाढल्यामुळे या स्पर्धेमधील लढतीही वाढणार आहेत. तब्बल 104 सामन्यांनंतर या स्पर्धेचा जेता ठरणार आहे.
कार्यकारिणी बैठकीत चर्चा एआयएफएफची कार्यकारिणीची बैठक 9 नोव्हेंबरला पार पडली. या बैठकीत कल्याण चौबे यांनी विश्वकरंडकातील काही सामने भारतात आयोजित करण्यासाठी योजना आखायला हवी, याबाबत आपले मत व्यक्त केले. 104 लढतींपैकी किमान दहा लढती भारतात खेळवण्यात याव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवा असे त्यांचे म्हणणे होते.
… तर भारतही खेळणार
भारताकडून सहयजमानपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला तर मग फिफा विश्वकरंडकात भारतीय संघही सहभागी होईल. कारण, यजमान संघाला पात्रता फेरीविना स्पर्धेत प्रवेश दिला जातो. भारतीय फुटबॉल क्षेत्रासाठी ही ऐतिहासिक व संस्मरणीय घटना असणार आहे.
