नियमांचे पालन करून स्पर्धेच्या नियमांत बदल
। पेण । वार्ताहर ।
स्व.प्रमोद (पिंट्या पाटील) यांच्या जयंतीचे औचित्य साधून कबड्डीचा उत्साह, थरार, आणि दंगा, चल घे पंगा… या टॅग लाईनखाली पेण कबड्डी प्रिमिअर लिग 29 व 30 डिसेंबर रोजी स्व.भाई मोहनराव पाटील स्टेडीयम गोविर्ले, हमरापूर वाडा पेण येथे रंगणार आहे. पेण तालुक्यातील मात्तबर खेळाडूंसह 16 संघामध्ये कबड्डीचा थरार रंगणार आहे. मात्र शासनाकडून आलेल्या नविन नियमानुसार या स्पर्धामध्ये बदल करण्यात आले असून ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लादण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून या स्पर्धा पार पाडणार आहेत.
हमरापूर वाडा येथे भव्य दिव्य क्रिडा नगरीत उभारण्यात आली असून या क्रिडा नगरीमध्ये 6 हजार प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आता फक्त 3 हजार प्रेक्षकांनाच या क्रिडा नगरीत प्रवेश दिला जाणार आहे. मात्र या प्रेक्षकांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रेक्षकांना मास्क हे बंधनकारक असेल. क्रिडा नगरीच्या प्रवेशद्वारावरच टेम्प्रेचर चेक केले जाईल. दोन डोस घेतलेल्याचा पुरावा देखील घेतला जाईल. त्यामुळे आयोजकांकडून क्रीडा रसिकांना नम्र विनंती आहे की, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करायचे आहे आणि कबड्डीचा आनंद घ्यायचा आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आ.जयंत पाटील, मा.आ.धैर्यशील पाटील, आ.बाळाराम पाटील, मा.आ.पंडीत पाटील, अॅड.निलीमा पाटील माजी जि.प.अध्यक्षा सभापती अर्थ व बांधकाम, अॅड.आस्वाद पाटील माजी उपाध्यक्ष,राजिप, जे.एम.म्हात्रे उद्योजक, नारायण बोलबंडा जनसंपर्क अधिकारी जे.एस.डब्ल्यू, राजू पिचिका उद्योजक यांच्या सह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.