| अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ वेगवेगळ्या योजना राबवित आहे. मात्र त्याच प्रवाशांना सुविधा उपलब्ध करण्यास महामंडळ उदासीन ठरत असल्याचे समोर आले आहे. एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांना तिकीट देताना मशीन वारंवार हँग होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्याचा मनस्ताप वाहकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. जुन्या खराब झालेल्या मशीनच्या भरोवश्यावर एसटीचा कारभार चालत असल्याने वाहकांना त्याचा त्रास प्रचंड होत आहे. याकडे प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
एसटी महामंडळ रायगड विभागात अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव व महाड असे आठ एसटी बस आगार असून 19 बस स्थानके आहेत. या आगारात 480 एसटी बसेस असून अडीच हजार कर्मचारी आहेत. त्यात चालक व वाहकांची संख्या दीड हजार पेक्षा अधिक आहे. एसटीतून दिवसाला 30 लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. आठ ते दहा वर्षापुर्वी साधे कागदी तिकीट होते. त्यात हळुहळू बदल करून मशीनद्वारे तिकीट सेवा सुरु केली. गेल्या दहा वर्षापासून या मशीनद्वारेच तिकीट प्रवाशांना दिले जात आहे. मात्र मशीन सतत बंद पडण्याबरोबरच हँग होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. मशीन पूर्णपणे चार्ज केल्यानंतरही ते एक-दोन तास चालत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी बॅटरी बदलून मशीन चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.
मशीन हँग झाल्यामुळे तिकीट अडकून पडल्याने प्रवाशांना वेळेवर तिकीट वितरित होत नाही. तिकीट मशीनच्या बॅटरीमध्ये समस्या निर्माण होत आहे. मशीन बंद पडण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे. अनेक वेळा बिघडलेल्या मशीनमुळे तिकीट वेळेवर न मिळाल्याने वाहक व प्रवाशांसोबत शाब्दीक चकमकही होत आहे. तिकीट वेळेवर देण्यासाठी वाहकांना अनेक वेळा एका बाजुला एसटी थांबवून प्रवाशांना तिकीट द्यावे लागत आहे. मशीन सतत बंद पडणे, तिकीट न निघणे, 15 ते 20 मिनीट मशीन बंद राहणे अशा अनेक समस्यांना वाहकांना तोंड द्यावे लागत आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबवित असताना बंद पडलेल्या मशीनच्या दुरुस्ती अथवा नवीन मशीनचा पुरवठा करण्यास एसटी महामंडळ रायगड विभाग उदासीन ठरत असल्याचे दिसून येत आहे.