जंजिर्‍याचे बाह्यदर्शन घेऊन पर्यटक मुरुडला

समुद्रकिनारी आलेल्या शेवाळमुळे किनारा विद्रुप
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
रविवारी मध्यरात्री अचानक समुद्रातून किनार्‍यावर पसरलेल्या शेवाळमुळे किनारा विद्रुप बनला आहे. सुमारे 4 कि.मी. समुद्रकिनार्‍यावर हे शेवाळचे मोठे धब्बे जागोजागी दिसत असून, या आकस्मिक प्रकारामुळे अनेकजण चिंतेत पडले आहेत. असा प्रकार काही प्रमाणात पावसाळ्यात होत असतो, अशी माहिती कोळी मच्छिमार बांधवांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जंजिरा कुलूपबंद असल्याने आलेल्या पर्यटकांना जंजिर्‍याचे बाहेरून दर्शन घेता आले. रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, किनार्‍यावर वाहून आलेली शेवाळ विषारी नसून, शेतीसाठी याचा उत्तम खत म्हणून वापर केला जाऊ शकतो. ते म्हणाले की, खोल समुद्रात घडणार्‍या भूगर्भातील अचानक होणार्‍या उलथापालथीमुळे अनेक घटना घडू शकतात. त्यापैकीच ही असावी. रविवारी पहाटेपासून शेवाळ किनार्‍यावर येण्यास सुरुवात झाली याचा अर्थ किमान दोन दिवस आधी समुद्रात वादळ अथवा अंतर्गत भूगर्भातील हालचाली झाल्या असाव्यात, असे मत बैले यांनी व्यक्त केले. कोरोना पार्श्‍वभूमीवर जंजिरा जलदुर्ग कुलूपबंद असल्याने पर्यटकांनी खोरा जेट्टी आणि राजपुरी जेटीवर जाऊन जंजिर्‍याचे बाह्य दर्शन घेतले. त्यानंतर पर्यटकांनी मुरूड समुद्र किनार्‍यावर शेवाळ असूनही पाण्यात आनंद लुटला.


महाबळेश्‍वर, पांचगणी सुरू; जंजिरा मात्र बंद
प्रशासनात एकवाक्यता राहिली नाही असा प्रकार मुरुडमध्ये पाहायला मिळत आहे.कोरोना पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाने जंजिरा आतून पाहण्यास बंदी केली आहे. मागील वेळेस देखील असाच प्रकार करण्यात आला होता. मात्र, कालपासून महाबळेश्‍वर आणि पांचगणी परिसरातील पर्यटन स्थळे पुरेशी काळजी घेऊन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जंजिरा बंद असल्याने पर्यटक येण्यास नाखूष आहेत. हॉटेलिंग, लॉजिंग, बचत गट, खानावळी, छोटे दुकानदार हवालदिल असून, हा दुजाभाव का केला जातोय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Exit mobile version