नगराध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली?

विकासकाला पाठीशी घालत असल्याचा संशय

| पेण | प्रतिनिधी |

पेण नगरपरिषदेकडून शहरातील गटार आणि नाल्यांच्या साफसफाईसंदर्भात नुकताच विशेष दौरा आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्षांनी घटनास्थळीच बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना तातडीने आदेश देत, येत्या 8 दिवसांत हा नाला पूर्णपणे मोकळा झाला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, तब्बल 13 दिवस उलटूनही संबंधित ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका प्रशासन विकासकाला पाठीशी घालत असल्याचा संशय स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे.

पेण शहरातील गटार आणि नाल्यांच्या साफसफाई संदर्भातील विशेष दौऱ्यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती कलावती पाटील, सभापती आफ्रीन अखवारे तसेच मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी संयुक्तपणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. यावेळी बोरगाव रोड परिसरातील एका नाल्यावर विकासकाने अतिक्रमण करून संपूर्ण इमारतीच्या टॉयलेट व बाथरूमच्या टाक्या बांधल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे अडथळला गेला असून, पावसाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. घटनास्थळीच नगराध्यक्षांनी बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना तातडीने आदेश देत, येत्या 8 दिवसांत हा नाला पूर्णपणे मोकळा झाला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, तब्बल 13 दिवस उलटूनही संबंधित ठिकाणी कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे. नाल्यावरील एकही वीट हलवण्यात आलेली नाही किंवा अतिक्रमण हटवण्याची कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आलेली नाही. याबाबत बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दि.13 मे रोजी संबंधित विकासकाला नाला मोकळा करण्याबाबत पत्र देण्यात आले असल्याचे सांगितले. मात्र, यामध्ये मोठा विरोधाभास समोर येत आहे. कारण नगराध्यक्षांचा दौरा आणि प्रत्यक्ष पाहणी देखील दि.13 मे रोजी सायंकाळी झाली होती. त्यामुळे त्या दिवशीच पत्र कसे देण्यात आले? की दौऱ्यानंतर रात्री पत्र देण्यात आले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पालिका प्रशासन विकासकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Exit mobile version