जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगडसह कोकणातील प्रसिद्ध गणेशोत्सवाची परंपरा आता जगाच्या नकाशावर येणार आहे. धार्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परंपरेला जगाच्या नकाशावर ओळख देण्यासाठी डिजीटल मंचचा आधार घेतला आहे. गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी, अनुभव, पारंपरिक प्रथा, आरत्या, छायाचित्रे, नैवेद्य व पाककृती तसेच उत्सवाशी संबंधित सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती Bappa.org वर नोंदविता येणार आहे. त्यासाठी या पोर्टलवर नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाची परंपरा जगासमोर आणली जाणार आहे.
रायगडसह कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दीड दिवसांपासून पाच,सहा तसेच अनंत चतुर्थीच्या दहा दिवसांपर्यंत गणेशमूर्ती घराघरात विराजमान होते. या कालावधीत बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार करण्यापासून पूजेचे साहित्य, सजावटीवर अधिक भर दिला जातो. अबालवृध्दांपासून सर्वच मंडळी या उत्सवात सहभागी होतात. रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी, सिंधुदूर्ग आदी जिल्ह्यातून सुरु झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज महाराष्ट्राच्या अनेक भागात सुरु आहे. वेगवेगळ्या आकाराचे रंगाच्या गणेशमूर्ती आणून त्यांची प्रतिष्ठापना केली जाते. मनोभावे सेवा केली जाते. ग्रामीण भागासह शहरी भागात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम तसेच समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जातात. एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून येतो. रायगडसह कोकणातून सुरु झालेल्या या परंपरेला राज्य महोत्सव म्हणून ओळखले जात आहे. अनेक कुटुंबे आणि गणेश मंडळे पिढ्यानपिढ्या पारंपरिक प्रथा जपत आहेत. आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा Bappa.org या पोर्टलद्वारे जगासमोर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. आपल्या बाप्पाशी जोडलेल्या आठवणी, श्रद्धा आणि परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केल जाणार आहे. या महोत्सवासह परंपरा, संस्कृती, एकोप्याची माहिती जगाच्या नकाशावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरतीचे ध्वनिचित्रमुद्रण, गणेशोत्सवाची छायाचित्रे, पारंपरिक नैवेद्य व पाककृती, तसेच गणेशोत्सवाशी संबंधित विशेष परंपरांची माहिती या माध्यमातून शेअर केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये साडेतीन हजारहून अधिक नोंदणी होणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन घरच्यासह सार्वजनिक गणेश मुर्तींचे आकर्षक फोटो,सार्वजनिक उपक्रम याचे छायाचित्र या पोर्टलवर पाठविली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि वैशिष्ट्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी 'Bappa.org' हा अधिकृत डिजिटल मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाशी संबंधित विविध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्या पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या बाप्पाशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि आठवणी जगासमोर आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.






