। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील वृत्तपत्र विक्रेते बल्लाळ परशुराम जोशी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घडवितात. अशी एकसारखी मूर्ती घडवण्याची जोशी कुटुंबाची 51 वर्षाची परंपरा आहे. शाडूच्या मातीपासून बनवली जाणारी गणेशमूर्ती तयार झाली या मूर्तीला रंगसंगती देण्याचे काम नेरळमधील कुंभारवाड्यात सुरु झाले आहे. मोठ्या अपघातातून वाचलेले बल्लाळ जोशी हे स्वत:ला सावरून गणेशमूर्ती घडवण्याचे कार्य अविरत करीत आहेत.
नेरळ येथील वृत्तपत्र विक्रेते बल्लाळ जोशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. वृत्तपत्रे विकण्याचे काम करणारे जोशी यांनी मागील अनेक वर्षे आपल्या व्यवसायाला साजेसे असे करीत कागद्याच्या लगद्यापासून गणेशमूर्ती घडविण्याचे काम स्वतः आवडीने करतात. त्याच आकाराची, रंगसंगती, एकाच प्रकारची आणि पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यासाठी बल्लाळ जोशी यांना संपूर्ण कुटुंब मदत करीत असून त्यांनी घडवलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे हे 51 वे वर्ष आहे. म्हणजे अर्ध शतक एखादी मूर्ती आवडीने घडवण्याची परंपरा जोशी कुटुंबाने कायम ठेवली आहे.
शाडूच्या मातीपासून वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी भाद्रपद महिन्यात येणार्या बाप्पाची मूर्ती घडविण्यास सुरुवात केली. साधारण 15 इंच उंचीची सिंहासनाधिष्ठ असा बाप्पा आपल्या व्यवसायातून वेळ काढून बनवतात. एका हाताने भक्तांना वरदान देत असलेला आणि दुसर्या हाताने मोदक घेणारा असा बाप्पा बल्लाळ जोशी हे बनवतात. मागील पाच वर्षांपूर्वी त्यांनी कागदाच्या लगद्यापासून बाप्पाची इकोफ्रेंडली मूर्ती साकारली होती.
श्रावण महिना सुरू झाला की बाप्पाची मूर्ती बनविण्याचे काम सोयीनुसार करणारे बल्लाळ जोशी हे आपल्या हातांनी घडविलेल्या बाप्पाला नेरळच्या कुंभारवाड्यात नेऊन रंगरंगोटी करून घेतात. तेथे दहिवलीकर यांच्या कारखान्यात मिलिंद दहिवलीकर हे जोशी यांना रंगकाम करून देतात. नेरळ गावात शाडूच्या मूर्तींचीदेखील परंपरा येथील कुंभारवाड्याने जपली आहे. जोशी यांना त्यांच्या या कामात त्यांचे दोन्ही पुत्र तसेच दोन्ही स्नुषा आणि पत्नी यांची मदत होत असते. त्यामुळे सर्व जोशी कुटुंब शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती घडवण्यात व्यस्त असतात. ते स्वत: वृत्तपत्र विक्रेते असल्याने एका वर्षी त्यांनी कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्ती घडवली होती.