मातीच्या पणत्यांचा पारंपरिक उजेड कायम

दिवाळीनिमित्त छोट्या पणत्यांना वेगळीच शोभा; स्थानिक विक्रेत्यांच्या कलेला हातभार

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

बाजारात कितीही रंगीबेरंगी आणि आकर्षक पणत्या दाखल झाल्या, तरी लाल मातीच्या पणत्यांचे महत्त्व आजही कायम आहे. आधुनिक सजावटीच्या झगमगाटातही पारंपरिक मातीच्या पणत्यांबद्दल नागरिकांच्या मनात असलेले प्रेम कमी झालेले नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात लाल मातीच्या लहान-मोठ्या पणत्यांसह विविध आकारांच्या पणत्या आणि छोट्या कंदिलांची विक्री सुरू झाली आहे.

दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. या सणात घराच्या उंबरठ्यावर, तुळशीवृंदावनाजवळ आणि देवघरात पणत्या लावण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. काळानुसार पणत्यांच्या रंगांत, आकारांत आणि सजावटीत बदल झाला असला, तरी साध्या लाल मातीच्या पणतीची जागा मात्र आजही कायम आहे. मातीचा नैसर्गिक रंग आणि त्यात तेवणारी तेलाची ज्योतीमुळे पारंपरिक पणत्यांना वेगळीच शोभा प्राप्त होते.

लाल मातीची साधीशी पणती तयार करण्यामागे कुंभार आणि मातीच्या वस्तू बनवणाऱ्या कारागिरांचे कष्ट असतात. मातीला आकार देण्यापासून ती वाळवणे आणि भाजून तयार करण्यापर्यंत अनेक टप्प्यांतून पणती तयार होते. दिवाळीत या पणत्यांची खरेदी केल्याने पारंपरिक हस्तकलेला आणि स्थानिक विक्रेत्यांनाही हातभार लागतो.

आज बाजारात विविध रंगांच्या पणत्या उपलब्ध असल्या, तरी लाल मातीच्या पणतीतून मिळणारा पारंपरिक प्रकाश मनाला वेगळे समाधान देतो. विजेच्या दिव्यांची कितीही रोषणाई असली, तरी तेलाच्या पणतीची छोटीशी ज्योत घरात प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीतही पनवेलकरांच्या खरेदीत लाल मातीच्या पणत्यांना महत्त्वाचे स्थान मिळत आहे.

पारंपरिक पणत्यांना आजही पसंती
छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवाळीसाठी विविध आकारांच्या लाल मातीच्या पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. घराच्या दारात लावण्यासाठी मोठ्या पणत्या, देवघरासाठी छोट्या पणत्या, तर रांगोळीच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या आकारांच्या पणत्या उपलब्ध आहेत. आधुनिक काळात इलेक्ट्रिक दिव्यांचा वापर वाढला असला, तरी तेल-वातीची पणती लावण्याचा आनंद काही वेगळाच असल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येते.
छोट्या कंदिलांनी बाजारपेठ सजली
पणत्यांसोबतच घराची सजावट करण्यासाठी छोटे-छोटे आकर्षक कंदीलही बाजारात दाखल झाले आहेत. घराच्या प्रवेशद्वारावर, खिडक्यांमध्ये किंवा बाल्कनीत लावण्यासाठी हे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पणत्या आणि कंदील यांच्या खरेदीतून बाजारपेठेत दिवाळीची चाहूल स्पष्टपणे जाणवू लागली आहे.
Exit mobile version