। उरण । वार्ताहर ।
चिरनेर आश्रमशाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणार्या सृष्टी राजू शिद (9) या आदिवासी मूलीचा मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19) घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर गावात श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर, संचलित, अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा असून या शाळेत उरण, पनवेल तालुक्यातील व इतर आदिवासी वाडीवरील एकूण 240 मूले शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि. 18) सकाळी सृष्टी शिद हिच्या छातीमध्ये दुखत असल्याबाबत विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी सदर घटनेची माहिती मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे यांना दिली असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथील डॉक्टरांशी संपर्क साधला व सृष्टीच्या आजाराची माहिती दिली असता तेथील डॉक्टरांनी आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध नाहीत, तुम्ही उपजिल्हा रूग्णालय पनवेल या ठिकाणी मूलीला घेऊन जाण्याबाबत सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे यांनी सदर मूलीच्या तब्येतीची माहिती सृष्टीच्या आई वडिलांना दिली. त्यानंतर सृष्टीला आपल्या सहकार्यांच्या मदतीने पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र तेथेही उपचार न झाल्याने त्यांनी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात या मूलीला पुढील उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान सृष्टीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच सृष्टी शिद या मूलीचा मृत्यू हा जंतू संसर्गामुळे झाल्याचे वृत्त समोर येत असले तरी सदर घटनेची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ हे घेत आहेत.