गारभट खिंडीतील झाडे धोकादायक

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील दुर्गम भागातील गारभट खिंडीतील उतारावरील झाडे प्रवास व वाहतूकीच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगर उताराची झीज होऊन या खिंडीतील मातीचा आधार असलेली तुरळक झाडे कोसळली आहेत. तर काही झाडे कोसळण्याच्या स्थितीत असल्याने खिंडीतील मार्ग धोकादायक बनला आहे. संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन संबंधीत विभागाने धोकादायक ठरणारी झाडे तोडण्याची मागणी जोर धरत आहे.

विठ्ठलवाडी-गारभटचा परिसर जरी तालुक्यातील दुर्गम भागातील असला तरी या परिसरातील गावांची संख्याही फार मोठी आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच रहदारी आढळून येते. तसेच हा परिसर दुर्गम, डोंगराळ व निसर्गरम्य परिसरात आहे. या ठिकाणी असणारे विविध फार्म हाऊस तसेच सुप्रसिद्ध असणारा ऐनवहाळ येथील धबधबा, डोलवहाल बंधाऱ्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. तसेच गेल्या वर्षापासून रोहा ते विठ्ठलवाडी लाल परीही धाऊ लागल्याने संबंधितांनी लवकरच या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version