। उरण । वार्ताहर ।
सन्मान आणि पुरस्कार हे व्यक्तीच्या कर्तृत्वाची पावती मानले जातात. मात्र, सध्या पैशांच्या बळावर पुरस्कार विकत घेण्याचा ट्रेंड वाढला असून, त्यामुळे गुणवत्तेपेक्षा आर्थिक ताकदीलाच महत्त्व मिळत असल्याचे चित्र आहे. अलीकडे विविध संस्था, संघटना आणि काही खासगी कंपन्या पैशांच्या मोबदल्यात पुरस्कार प्रदान करत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा मोठ्या हॉटेल्स किंवा सभागृहांमध्ये झगमगत्या समारंभांचे आयोजन केले जाते. त्यासाठी नामांकनासाठी ठराविक रक्कम द्यावी लागते आणि ठराविक शुल्क भरल्यास हमखास पुरस्कार मिळतो. त्यामुळे खर्या गुणवंतांचा अनादर होत असून, केवळ आर्थिक बळ असलेल्या लोकांना प्रसिद्धी मिळवण्याचा सोपा मार्ग मिळत आहे. त्यामुळे अशा खोट्या पुरस्कारांवर कारवाई करावी, पुरस्कारांचे खरे मोल राखले जावे, त्यासाठी केवळ गुणवत्तेच्या आधारावरच पुरस्कार देण्याची पारदर्शी प्रणाली असावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.