खोटी कागदपत्र दाखवत फसवणूक केल्याचा खरेदीदरांचा दावा
। पनवेल । दीपक घरत ।
आयुष्यभर कष्ट केल्यानंतर निसर्गरम्य वातावरणात क्षण घालवता यावेत म्हणून आयुष्याची जमापुंजी खारघरमधील हिल व्ह्यू या इमारतीत घर घेतले. काही रहिवासी तर एक-दोन महिन्यापुर्वीच राहायला गेले. अनेक स्वप्नं बघितली पण सिडकोच्या कारवाईने हे सारे जण क्षणात बेघर झाले. डोळ्यादेखत आपण सजवलेलं घर पडताना पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. रहिवाशांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकांनाही अश्रु अनावर झाले. घरात बसून सुंदर टेकड्याचे दृश्य पाहायला मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून खारघर येथील ‘हिल व्ह्यू अपार्टमेंट’ या इमारतीत घर खरेदी करणार्या रहिवाशांवर भर उन्हात बसून इमारतीचे तोडकाम पाहण्याची वेळ बुधवारी (दि.2) आली. आई वडिलांनी कष्ट करून हे घर उभारलं होतं. याच घरात कुटूंबाचं भविष्य होतं. अचानक झालेल्या कारवाईमुळे आयुष्याचा आधार हिरावला गेल्याची प्रतिक्रिया घरातील कुटूंबप्रमुखांनी दिली.
इमारत उभारताना सिडकोची परवानगी न घेतल्याने खारघर येथील सेक्टर 5 येथील हेदोर वाडी या परिसरात बांधण्यात आलेल्या हिल व्ह्यू अपार्टमेंट या इमारतीवर सिडको विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. कारवाईची कोणतीच कल्पना नसलेले इमारतीमधील रहिवासी गाढ झोपेत असताना पहाटे चारच्या सुमारास सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक इमारतीबाहेर दाखल झाले. त्यामुळे झोप उडालेल्या रहिवाशांची घर खाली करताना चांगलीच दमछाक झाली. खारघरसारख्या वसाहतीत अगदी स्वस्तात घर मिळतंय या अमिषाला बळी पडून आपल्या आयुष्याची जमापुंजी घर खरेदीत गुंतवणार्या अनेक रहिवाशांना या वेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
घरातील सर्व सामान बाहेर काढण्यासाठी वेळ देखील सिडकोने दिली नसल्याची खंत सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रक्कम घर खरेदीत गुंतवणार्या व एका महिन्यापूर्वीच इमारतीत वास्तव्याला आलेल्या मूळचे राजापूर येथील रहिवासी असलेले जयदत्त कुंथळकर यांनी व्यक्त केली. कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी तसेच सिडकोचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. सिडकोच्या अनेक बड्या आधिकार्यांनी कारवाई स्थळी भेट देऊन तोडक कारवाईची पाहणी केली.
दुसर्यांदा कारवाई
सिडको अतिक्रमण विभागाकडून बुधवारी कारवाई करण्यात आलेल्या इमारतीवर या पूर्वी देखील कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतर देखील विकासकाने इमारत पुन्हा उभारून सदनिका विक्री केल्याने सिडकोने दुसर्यांदा कारवाई करत इमारत जमीनदोस्त केली आहे.
माजी नगरसेवका संशयच्या फेर्यात
इमारत उभारणार्या विकासकाकडे पालिकेतील काही माजी नगरसेवकांनी सदनिकांची मागणी केली होती. विकासकाने ती मागणी पूर्ण न केल्यानेच सिडको प्रशासनावर वरून दबाव आणत कारवाई करण्याला भाग पाडण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.
धुळीवर पाण्याचा मारा
कारवाई दरम्यान धुळ प्रदूषण होऊ नये, याची काळजी घेण्यात आली होती. या करता सिडकोच्या अग्निशमन विभागाचे वाहन कारवाईस्थळी तैनात ठेवण्यात आले होते. या वाहनातून पाण्याचा मारा इमारतीवर करण्यात येत होता.
ग्रामपंचयतीचा ठराव बनावट?
इमारतीमधील सदनिकांची विक्री करताना तत्कालीन ग्रामपंचायतीच्या वतीने इमारत बांधकाम आणि दुरुस्तीचा ठराव खरेदीदारांना दाखवण्यात येत होता. 2016 साली घेण्यात आलेल्या ठरावावेळी सरपंच म्हणून नी. द. म्हात्रे नावाच्या व्यक्तीने ठरवावर सही केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र त्यावेळी नी. द. म्हात्रे नावाची कोणतीही व्यक्ती सरपंच नसल्याची माहिती समोर आली असून, सरपंच म्हणून सही करणारी व्यक्ती कोण हा शोध घेणे जरुरीचे झाले आहे.