घरातून महीलांना व्यवसायाची संधी
। अलिबाग । सायली पाटील ।
सर्वांच्याच लाडक्या बाप्पाचा सण आता फक्त 4 दिवसांवर येउन ठेपला आहे. थोड्याच दिवसात गणेशाचं आगमन होणार असल्याने सगळीकडेच कामांची लगबग सुरू झाली आहे. त्यातही गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाचे आवडते मोदक आवर्जून येतात. आणि याच मोदकांची परंपरा जोपासत पारंपारिक उकडीच्या मोदकांना बगल देत अनेक गृहीणींनी विविध प्रकारचे मोदक बनवित घरबसल्या व्यवसाय सुरू केले आहेत.
बाप्पाचा तसेच सर्वांचा आवडता मोदक हा जर विविध फ्लेवर्समध्ये मिळाला तर अगदी लहानांपासून ते माठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. कोरोनामध्ये सगळीकडेच आर्थिक मंदी आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. गेली 2 वर्षे प्रत्येकालाच पैशांची कणकण भासत आहे. परंतु या परिस्थितीत संकटाचे रडगाणे गात बसण्यापेक्षा त्यातून काहीतरी मार्ग काढणे अतिशय गरजेचे आहे. अशाचप्रकारे काही स्त्रियांनी परिस्थितीला मात देण्यासाठी तर काहींनी योग्य संधीचा वापर करत आवड जोपासण्यासाठी या गणपती स्पेशल चॉकलेट मोदकांचा घाट घातला आहे.
तसेच सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येकजणच स्वत:च्या तब्येतीला जपण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळत असल्याने घरगुती पदार्थांना जास्त वाव मिळतो आहे. आणि हीच योग्य संधी साधून अनेक महीलांनी घरबसल्या चॉकलेट मोदकांचा व्यवसाय सुरू करत त्या संधीचे सोने केले आहे. या व्यवसायासाठी बाहेर जाण्याची गरज नसून घरकाम करता करता वेळ काढून स्वत:ची पदार्थ बनविण्याची रूची जोपासता येते. तसेच या सर्व महिलांनी घरबसल्या छोटेखानी का होईना पण उद्योगात आपले पाय रोवले आहेत.
याच संदर्भात जाणून घेण्यासाठी नागाव बंदर येथे राहणय्रा शामल राऊळ यांच्याशी संवाद साधला असता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनला सुवर्णसंधी बनवित चॉकलेट मोदकांचा हा छोटेखानी व्यवसाय सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या बनवत असलेल्या चॉकलेट मोदकांमध्ये रसमलाई फ्लेवर ही त्यांची स्पेशालिटी असून त्या डार्क चॉकलेट मोदक, व्हाईट चॉकलेट मोदक, पान चॉकलेट मोदक, बदाम चॉकलेट मोदक, काजू चॉकलेट मोदक, कोकोनट चॉकलेट मोदक, मिक्स्ड ड्रायफ्रुट चॉकलेट मोदक, रसमलाई चॉकलेट मोदक, पाईनअॅप्पल चॉकलेट मोदक, बटरस्कॉच चॉकलेट मोदक व स्ट्रॉबेरी चॉकलेट मोदक इत्यादी फ्लेवर्सचे चॉकलेट मोदक बनवतात. हा व्यवसाय गेल्यावर्षीपासूनच सुरू केला असून मागील वर्षी 4000 मोदक विकले गेले व यावर्षीही बय्राच ऑर्डर्स आल्या आहेत. यामधून रूचीही जपता येतेे आणि हा कमावण्याचाही एक उत्तम मार्ग आहे. तसेच 11 मोदक व 21 मोदक असे बॉक्सेस त्या विकत असल्याची माहीतीही त्यांनी दिली.
- युट्युबवरून शिकून नंतर स्वत:च्या रूचीनुसार फ्लेवर्स बनवत मी चॉकलेट मोदक बनविण्याची सुरूवात केली. डेसिक्केटेड कोकोनट मोदक आणि मावा मोदक ही माझी स्पेशालिटी आहे. त्यामुळे कोरोना आल्यापासून तर होममेड फुड हा जणू ट्रेंडच बनला आहे. – ममता वर्तक, वरसोली-अलिबाग.
- स्वत:ची पाककलेची रूची जपता येते तसेच हा व्यवसाय घरबसल्या करता येत असल्याने कामावर जाणाय्रा महिलांसाठी हा एक चांगला साईड बिझनेस आहे. आणि हा छोटेखानी व्यवसाय का असेना पण लोकांचा खुपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. -आसावरी वर्तक, वरसोली-अलिबाग.
शामल राऊळ, नागाव बंदर –
फ्लेवर्स 11 मोदकांचा बॉक्स 21 मोदकांचा बॉक्स
डार्क चॉकलेट मोदक 70 रूपये 130 रूपये
व्हाईट चॉकलेट मोदक 70 रूपये 130 रूपये
पान चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये
बदाम चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये
काजू चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये
कोकोनट चॉकलेट मोदक 70 रूपये 130 रूपये
मिक्स्ड ड्रायफ्रुट चॉकलेट मोद 100 रूपये 190 रूपये
रसमलाई चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये
पाईनअॅपल चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये
बटरस्कॉच चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये
स्ट्राबेरी चॉकलेट मोदक 80 रूपये 150 रूपये