| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसे बाळगणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गस्ती पोलिसांच्या सतर्कतेने करण्यात आली आहे. संशयित आरोपीनी एखाद्याची हत्या करण्यासाठी गावठी कट्टा आणला होता की कोणास विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करीत आहेत.
स्वातंत्र्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अधिकची गस्त सुरु होती. दरम्यान, गुरुवारी (दि.14) कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस हवालदार ललित महाजन यांना सेक्टर 23 येथील शांतिदूत महावीर उद्यान, सार्वजनिक स्वच्छता गृह बाजूला, असणाऱ्या पेट कॉर्नरजवळ संशयित फिरत आहेत अशी माहिती मिळाली. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांना ही माहिती देताच त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक उमेश शेडगे यांचे पथक रवाना केले. सेक्टर 23 व परिसरात शोध घेतला असता तिन्ही संशयित मिळून आले. पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा आणि सहा जिवंत काडतुसे मिळुन आलेली आहेत. त्याचे मूल्य हे कट्टा 30 हजार तर सहा काडतुसाचे प्रयेकी एक हजार असे सहा हजार तर एकूण 36 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आले आहे. सौतमरतन प्रकाश सिंग(24), पिंटु सोमपाल कुमार (22) धंदा शेती आणि अभय बॉबी राजपुत, (24) सर्वजण राहणार कोपरखैरणे सेक्टर 19, नवी मुंबई, मूळ राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. संशयित आरोपीनी हे बेकायदा शस्त्र कशासाठी कोणासाठी आणले की स्वतः वापर करत होते याबाबत तपास सुरु आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.
गावठी कट्टासह तीन जिवंत काडतूसे बाळगणाऱ्या त्रिकुटास अटक
