अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गावठी कट्टा विक्री करताना दोन जण स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने रंगेहाथ पकडले आहेत, अधिक तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने कर्जत मधील तिघाजणांना अटक केली आहे.
गुरुवारी (दि.10) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबागचे पोलीस हवालदार राजेश पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कर्जत-नेरळ रोडने दोन व्यक्ती गावठी कट्टा विक्री करण्याकरिता बदलापूर जिल्हा ठाणे येथे जाणार आहेत. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि राजेश पाटील, यशवंत झेमसे, प्रतिक सावंत, अमोल हंबीर, देवराम कोरम, राकेश म्हात्रे या पथकाने एका काळे रंगाच्यास मोटार सायकल वरून येणार्या दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नावं गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे रविंद्र आनंद वैद्य (वय 35) राहणार दहिवली, तालुका कर्जत, सौरभ सुनिल नवले (वय-26) रा.संत रोहिदास नगर, गुंडगे, तालुका कर्जत अशी असल्याचे सांगितले. सदर इसमांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. सदर बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदरचा गावठी कट्टा हा सुनिल त्र्यंबक वाठोरे (वय 36) राहणार पंचशील नगर, गुंडगे, तालुका कर्जत यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले. वरील तिन्ही आरोपी त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींकडून 25 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, 1 हजार रुपये किंमतीची एकूण दोन पितळी काडतुसे, 15 हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपीपैकी सौरभ नवले याच्यावर शिरवळ पोलीस ठाणे जिल्हा-सातारा येथे गुन्हा शस्त्र अधिनियम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश धोंडे हे करीत आहेत.