साईडपट्टीअभावी ट्रक कलंडला

| नागोठणे | वार्ताहर |

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा नागोठणे हद्दीतपुरता बोजवारा उडाला असून मुंबईकडे लाकडे घेऊन जाणारा ट्रक साईटपट्टीअभावी रस्त्याखाली जाऊन कलंडल्याने नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रविवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.

नागोठण्यातील हायवेनाका येथील सरकारी दवाखान्यासमोर असलेल्या सर्व्हिस रोड वरूनच सध्या मुंबई व कोकणात जाणाऱ्या गाड्यांचा प्रवास सुरू आहे. या सर्व्हिस रोडवर पेव्हर ब्लॉक टाकून रस्त्याचे काम करण्यात आले आहे. हा पेव्हर ब्लॉकचा रस्ता जागोजागी खचला असल्याने या सर्व्हिस रोडवर अनेक खाचखळगे तयार झाले आहेत. अशाच प्रकारे मंडणगडहून लाकडे भरून मुंबईकडे निघालेला ट्रक नागोठण्यातील सरकारी दवाखान्यासमोरील याच सर्व्हिस रोडवर आला असता साईटपट्टी नसल्याने हा ट्रक रस्त्याखाली जाऊन कलंडला. त्यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा ट्रक क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला. यावेळी महामार्गावर थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Exit mobile version