महाराष्ट्र आणि तेलंगणा या बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी रविवारी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले आणि पुन्हा एकदा तिसर्या आघाडीच्या दोन वर्षांनंतरच्या सत्तापालटासाठीच्या प्रयत्नांना वेग आला आहे. अर्थात, तिसरी आघाडी हा काही प्रकार देशाला नवीन नाही. काही काळ तो थट्टेवारी नेण्यासारखाही सर्वसामान्य झाला होता. परंतु, दोन दशकांपूर्वी सत्तेत बदल घडवून आणण्यात या प्रयोगाला यश मिळाले होते आणि या देशाने तोही प्रयत्न देशाच्या इतिहासाचा भाग बनवला होता. या आघाडीपुढे दोन महत्त्वाची आव्हाने असतात. एक म्हणजे, त्यात अनेक घटक पक्षांचा समावेश असल्याने आणि दोन आघाडीचे मोठे पक्ष विरोधात असल्याने त्याच्या स्थैर्याविषयी जनता नेहमी साशंक असते. आणि दुसरे म्हणजे, या सर्व पक्षांना समान किमान कार्यक्रमाबाबत सहमती ठरवून काम करावे लागत असल्याने त्यात कळीच्या प्रश्नांना आवश्यक तो अग्रक्रम आणि त्याला सुस्पष्ट राजकीय पाठिंबा मिळतो असे नाही. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपला विधानसभेत धूळ चारल्यानंतर असाच मुंबईत येऊन तिसर्या आघाडीच्या प्रयत्नांना वेग दिला होता. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेत पुन्हा मुंबईतूनच या प्रयत्नांना नव्याने ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच प्रोत्साहन होते. कारण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निमंत्रणावरुनच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मुंबईत येऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी भाजपविरोधी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानुसार महाराष्ट्र आणि तेलंगणा या बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. कारण, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर जाहीर टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील वातावरण गढूळ बनवण्याला केंद्र सरकार कसे जबाबदार आहे, त्यांचे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सुडाचे राजकारण कसे सुरू आहे, याबद्दल टीका केली. तर, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला. देशभरात बदलाच्या आवश्यकतेवर भर दिला जात असून, जनमत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात गेले आहे, असे मानण्याला आधार आहे. कारण, खास करून ते दुसर्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने देशात जनतेचे हाल केले आहेत, त्यानुसार अन्य विरोधी पक्षांना या बदलाच्या भावनेला मतांत परिवर्तीत करण्याची संधी दिसू शकते. म्हणूनच बदल ही काळाची गरज आहे, असे मत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जुलुमाच्या विरोधात महाराष्ट्राच्या भूमीवरुन सुरू होणारा संघर्ष यशस्वी होतो, असे सूचक वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी यावेळी केले. राव यांच्या मते, देशात बदल घडविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू असून, सगळे जुळून यायला थोडा वेळ लागला तरी सारे संघटित होतील आणि चित्र बदलेल. कारण, ही लढाई लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आहे, असे त्यांचे मत आहे. ममता बॅनर्जींपेक्षा राव यांच्या भूमिकेत फार फरक नसला तरी, ते आधी भाजपच्या मित्रांत गणले जायचे. आता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे आणि त्यांनी गेल्या आठवड्यात भाजपवर घणाघाती टीका करून नवीन सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या या ताज्या भूमिकेमागे त्यांची राजकीय अपरिहार्यता किती आणि आघाडीसाठीची कटिबद्धता किती, याचा अंदाज न आल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तिसरी आघाडीची चर्चा गांभीर्याने घेतली नाही, असे सांगितले जात आहे. राव यांनी पवार यांचीही भेट घेतली, त्यामुळे पवार यांचे अनुभव आणि सर्वांना एकत्र आणू शकण्याची त्यांची क्षमता गृहित धरता ती भेट महत्त्वाची आहेच. ही आघाडी आकाराला आली तर त्यात काँग्रेसचा समावेश असेल की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण, राव यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली नाही. त्यावर काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी आकाराला येऊ शकत नाही वा यशस्वी होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यावेळीही याच मुद्द्यावरुन गोष्टी पुढे सरकल्या नव्हत्या. यात व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा किती पुढे येतात, हा मुद्दादेखील या आघाडीचे भवितव्य ठरवणारा असेल.





