वरदायनी देवीची यात्रा उत्साहात

| पाली | प्रतिनिधी |

राबगाव येथील वरदायनी देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौणिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात व जल्लोष पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दुपारी 4 वाजल्यापासून या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे राबगाव व गावांच्या असलेल्या चार वाड्यामधून महादेवाच्या काठ्या नाचवत आणल्या जातात. ढोळ ताशे व डिजेच्या तालावर या रंगीबेरंगी सजवलेल्या काठ्या तरुणाई तसेच काही जेष्ठ मंडळीदेखील मोठ्या हौसेने नाचवतात. या एक दिवसाच्या यात्रेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविक आपली उपस्थिती दाखवितात. यात्रेमध्ये मिठाईची दुकाने, लहान मुलांची खेळणी असलेली दुकाने, विविध खाद्याचे स्टॉल लागलेले असतात. यातून सर्व व्यावसायीकांची लाखो रुपयाची उलाढाल होते. यात्रा संपल्यानंतर वरदायनी देवीची पालखी मंदिरातून हरीनामाच्या जयघोषात निघून संपूर्ण गावात फिरते. यावेळी पालखीचा स्वागतासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढून पताका लावुन सजावट केलेली असते. वरदायनी देवीच्या यात्रेत उंबरवाडी, आदिवासीवाडी, नंबरवाडी, गावडेवाडी, जांभूळमाळ आदि वाडीतील लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.

Exit mobile version