उद्या वढाव येथे बहिरीदेवाचा यात्रा महोत्सव
| पेण | प्रतिनिधी |
पेण-वढाव ता. पेण येथील श्री बहिरी देवस्थानाची यात्रा चैत्र शुध्द त्रयोदशी मंगळवार, दि. 4 एप्रिल रोजी होत आहे. मंगळवारी 4 एप्रिलला बहिरीदेवाचा छबिना दुपारी बारा वाजता ढोलाच्या गजरात बहिरी देवाची गाणी म्हणत छबिना निघतो. बहिरी देवाच्या सोबत पाठीवर व पायावर पेरकुटे (निवडुंग) भाविक भक्तजन मारतात. पाठ व पायाच्या पोटर्या यांतून रक्त निघून ते भळभळा वाहते. भक्तजनांच्या पाठीवर त्यावेळी हळद टाकली जाते. पाठीवर पेरकुटाचे रुतलेले काटे नंतर एक ते दोन दिवसांनी पाठीतून आपोआप बाहेर निघतात. हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
बहिरीदेव मोठेवढाववरून वढाव येथे राधाकृष्णाच्या देवळाजवळ आल्यावर शर्यतीच्या हेलकोटी (देवकाठ्या) उभारल्या जातात. या काठ्या उंच अशा कळकीच्या बांबूपासून बनविलेले असतात. त्यातून 1 ते 3 क्रमांक काढले जातात. त्यानंतर ढोल वाजवायाच्या एक चाल व दोन चाल या चालीच्या ढोलाच्या वाजवायाच्या स्पर्धा होऊन विजेत्यास बक्षीस दिले जाते. या बहिरीदेवाचा विशेष म्हणजे ही मूर्त 80 वर्षांपूर्वी एका अखंड लाकडाची असून, त्या लाकडाचा घोडा व घोड्यावर स्वार झालेला बहिरीदेव अशी ही लाकडाची मूर्त असून, एवढी वर्ष आतापर्यंत होत आली तरी या मूर्तीस भंग झाला नाही अथवा तडा गेलेली नाही. बहिरी पाच दिवस देवळाबाहेर ठेवून सतत चार दिवस ढोलावर तालात गाणी म्हटली जाऊन जागरण केले जाते. नंतर पाचव्या दिवशी सकाळी अभिषेक करून सकाळी नऊ वाजता बहिरीदेव त्याच्या सिंहासनावर ठेवला जातो. बहिरीदेवाची यात्रा झाल्यानंतर दुसर्याच दिवशी खारेपाटातील मानाची यात्रा म्हणजे आई जगदंबे वाशीची यात्रा असते.
पेणमधील प्रसिध्द यात्रा
मंगळवार 04 एप्रिल वढाव येथील काळभैरव देवाची यात्रा, बुधवार05 एप्रिल वाशी येथील वरसूबाय जगदंबा भवानी देवीची यात्रा, गुरूवार 06 एप्रिल बोरी आक्कादेवीची यात्रा, नवघर, गडब येथील, 08 एप्रिल वरेडी येथील काळभैरव देवाची यात्रा, शनिवार 20 एप्रिल रावे गावच्या आई रायबादेवीची यात्रा, शनिवार 22 एप्रिल जिते गावची सत्यनारायण देवाची यात्रा.