उन्हाळी सुट्टीमुळे गावगाडा बहरला

धार्मिक विधींनी गावोगावी उत्साह

| माणगाव | प्रतिनिधी |

उन्हाळी सुट्टीच्या निमीत्ताने नोकरी व्यवसायानिमित्त परगावी, शहरात राहणारी कुटुंब आपापल्या गावी परतली असून गावगाडा बहरून गेला आहे. जिल्ह्यातील अनेक गावे सुटीच्या दिवसांत गजबजली असून विविध प्रकारच्या धार्मिक, सांस्कृतिक तसेच लग्न विधी कार्यक्रमांची रेलचेल गावोगावी सुरू आहे. चाकरमान्यांसाठी दिवाळी, गणेशोस्तव व उन्हाळी सुट्टी हे तीन हंगाम गावाकडे येण्यासाठी खास असतात. शाळांना तसेच कार्यालयांना दीर्घ सुट्या असल्याने अनेक चाकरमानी या दिवसांत गावाकडे येतात. एरवी गावामध्ये असलेला शुकशुकाट या दिवसात नाहीसा होऊन मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे गावात आगमन होत असल्याने गावे गजबजतात. उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने अनेक गावे या निमित्ताने भरून गेली आहेत.

उन्हाळी सुट्टीचा हा काळ ग्रामस्थ, चाकरमानी,कुटुंबीय यांच्यासाठी महत्वाचा असतो. गावातील सार्वजनिक उत्सव,पूजाविधी ,कुलाचार ,धार्मिक ,घरगुती कार्यक्रम या सुट्टीच्या काळात सुरू असून अनेक गावातून उत्सवी वातावरण आहे. गावकीच्या धार्मिक पूजाविधी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मनोरंजनात्मक खेळ, सत्यनारायण पूजा, गोंधळ कार्यक्रम या सुट्टीच्या काळात संपन्न होत आहेत.

नोकरी व्यवसायानिमित्त परगावी असणारे ग्रामस्थ मुलाबाळांना शालेय सुट्ट्या लागल्या असल्याने गावाकडे आली आहेत. गावात अनेक कुटुंब परतली असल्याने गाव गजबजले आहे. यानिमित्ताने अनेक कौटुंबिक सामाजिक कार्यक्रम सुरू आहेत, यामुळे गावात एक प्रकारचे उत्सवी वातावरण आहे.

शंकर शेडगे, ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ता, माणगाव

उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गावात सार्वजनिक पूजा, कौतुक समारंभ व स्नेहभोजनाचे, स्पर्धात्मक कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. संपूर्ण गाव या निमित्ताने एकत्रित येऊन उत्सवाचा आनंद घेतात. अत्यंत उत्सवी वातावरण या काळात असून गाव गजबजला आहे.

बाळाराम मांडवकर, मुंबईकर नोकरदार, सामाजिक कार्यकर्ता
Exit mobile version