| महाड | वार्ताहर |
2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. या गावाचे पुनर्वसन तळीये गावाच्या सुरक्षित भागामध्ये केले जात आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या घरांचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सर्व सोयी सुविधा पूर्ण झाल्यानंतर आम्ही घरांचा ताबा घेऊ असे मत तळीये ग्रामस्थांनी व्यक्त केले.
पहिल्या टप्प्यांमध्ये 66 घरांचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ही घरे वेगळ्या पद्धतीचे असल्याने पुनर्वसन लवकर होईल असे प्रथमदर्शनी वाटत होते मात्र अनेक तांत्रिक कारणामुळे हे पुनर्वसन वर्षभर रखडले गेले. या कामाला आता वेग आला असून जिल्हा परिषद आणि म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी घरांची बांधकामे आणि इतर सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पक्की गटारे, वीज व्यवस्था, शाळा इमारत, आरोग्य उपकेंद्र, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा पूर्ण केल्या जात आहेत. पुनर्वसन योग्य आणि वेगाने होण्याच्या दृष्टीने तत्कालीन महाविकास आघाडीने हे काम म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार म्हाडाने हे पुनर्वसन हातात घेतले आहे.
या मध्ये 660 स्क्वेअर फुटाचे घर बांधले जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही घरे विटांची नसून यामध्ये प्रिफाय ए.ए.सी. सँडविचचा वापर होत असून केवळ काँक्रिट पिलर या ठिकाणी उभारले आहेत. इतर बांधकाम साहित्य तयार पद्धतीने आणून ते बसवण्याचे काम केलं जात आहे. या घरांवर सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज व्यवस्था करण्यात आली आहे. दोन बेड, हॉल, किचन आणि स्वच्छतागृह स्वरूपांचे हे घर दरडग्रस्तांना देण्यात येत आहे. या घरांच्या चहुबाजूने व त्याचे बांधकाम केले जात आहे. काही दिवसापूर्वी पडणाऱ्या पावसामध्ये यातील तीन घरांचे ओट्याचे बांधकाम किरकोळ स्वरूपामध्ये ढासळले गेले. मात्र या घरांच्या मूळ ढाच्याला कोणत्या स्वरूपाचा धक्का अगर खचण्याची भीती नसल्याचे येथील अभियंत्यांनी सांगितले.
एकीकडे कंटेनरमध्ये राहणाऱ्या या ग्रामस्थांना घरांचा ताबा लवकर हवा आहे. गुणवत्तापूर्ण आणि सर्व सुविधायुक्त घरांमध्ये लवकरच राहायला जाण्याची स्वप्न पूर्ण होण्याच्या आशेवर येथील ग्रामस्थ आहेत. यामुळे सदर कामावर ते जातीने लक्ष देऊन उभे आहेत. कोणत्याच प्रकारचे ढिसाळ काम होत नसून तशा प्रकारचे कामे आम्ही होऊन देखील देणार नाही. असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केल्याचे येथील सरपंच यांनी सांगितले. घरांचा जोता कोसळल्याची बातमी चुकीची नसून त्या बातम्यांचा विपर्यास केला जात आहे. यामुळे घरांच्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले.