पांगळोली नळपाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार; नवीन टेंडर काढल्याने शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
| म्हसळा | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील पांगळोली गावासाठी मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेत भीषण प्रशासकीय निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या योजनेसाठी 1 कोटी 4 लाखांपेक्षा अधिक निधी मंजूर होऊनही गावातील नागरिक आजही पाण्याच्या थेंबासाठी वणवण भटकत आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा संघटक अझहर धनसे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्राप्त निवेदनानुसार, डिसेंबर 2022 मध्ये पांगळोली ग्रामस्थांना अखंड जलपुरवठा व्हावा या हेतूने 1 कोटी 4 लाख 69 हजार 274 रुपयांची नळपाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. हे काम ठेकेदार राजेश टेमकर यांनी 13 टक्के जादा दराने स्वीकारले होते. मात्र, तीन वर्षे उलटूनही संपूर्ण गावाला पाणी मिळालेले नाही. केवळ एका मोहल्ल्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण काम करून ठेकेदाराने काम सोडून दिले आहे. तसेच, काम पूर्ण नसताना आणि ग्रामस्थ पाण्यासाठी त्रस्त असतानाही, संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताने ठेकेदाराला बिले अदा करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याऐवजी किंवा दंडात्मक कारवाई करण्याऐवजी याच कामासाठी प्रशासनाकडून 73 लाख रुपयांचे नवीन टेंडर काढण्यात आले आहे. त्यामुळे जनतेच्या करातून उभारलेल्या सार्वजनिक निधीचा हा थेट गैरवापर असल्याचा दावा करत, या संपूर्ण गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासनाकडे केलेल्या मागण्या
काम अपूर्ण सोडणाऱ्या व निकृष्ट काम करणाऱ्या राजेश टेमकर या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या उप-अभियांत्याला त्वरित निलंबित करण्यात यावे. तसेच, अदा केलेल्या बिलांची सखोल चौकशी करून पांगळोली गावाची पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हा संघटन अझहर धनसे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
दोषींवर तात्काळ कठोर, कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न झाल्यास, पांगळोलीकरांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील.
अझहर धनसे,
जिल्हा संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)






