24, 25 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी आणि कुठे होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असल्याचे दिसत आहे. वास्तविक, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची संभाव्य तारीख आणि ठिकाण यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव नोव्हेंबरच्या अखेरीस रियाधमध्ये होऊ शकतो. या मेगा लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मेगा लिलावापूर्वी एकूण 46 खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे.
आयपीएलचा मेगा लिलाव रियाधमध्ये 24 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. या मेगा लिलावात पंजाब किंग्स संघाकडे सर्वात मोठी पर्स असेल. पंजाबने केवळ दोन अनकॅप्ड खेळाडू प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांना कायम ठेवले आहेत. अशा परिस्थितीत संघ लिलावात मोठा पैसा खर्च करू शकतो. तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे नाव असलेले जोस बटलर, केएल राहुल, श्रेयस अय्यर, ग्लेन मॅक्सवेल आणि रिषभ पंत यांच्यासह अनेक मोठे खेळाडू आपापल्या संघाकडून रिलीज केले गेले आहेत. यामुळे सर्व फ्रँचायझी या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यास तयार असतील. याव्यतिरिक्त काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवरदेखील मोठा पैसा खर्च केला जाऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने हेन्रिक क्लासेन याच्यावर सर्वाधिक 23 कोटी रुपये खर्च केले. तर, विराट कोहली याला आरसीबीने व निकोलस पूरन याला लखनऊने 21 कोटी रुपये देत आपल्या संघात कायम ठेवले. याव्यतिरिक्त बर्याच संघांनी आपल्या पहिल्या रिटेन खेळाडूला 18 कोटी रुपये दिले. भारताचा व चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याला अनकॅप्ड खेळाडू घोषित करत चेन्नईने केवळ चार कोटींमध्ये कायम ठेवले.