कळंब येथील गोदाम भाताने फुल्ल

नवीन भाताच्या खरेदीत अडथळे
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कळंब येथे असलेले भात साठवण गोदाम मागील वर्षीच्या हंगामात खरेदी केलेल्या भाताच्या पोत्यांनी भरलेले आहे. त्यामुळे भाताची नवीन खरेदी करण्यात नेरळ विविध कार्यकारी सोसायटी यांना अडथळे येत आहेत. दरम्यान, भाताची हमी भावाने 2021च्या हंगामात झालेली असतानादेखील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने भाताची उचल केली नाही आणि त्यामुळे नव्याने सुरू असलेल्या हंगामात भाताची खरेदी करून साठवण करण्यात अडचणी येत आहेत.

कर्जत तालुक्यात चार ठिकाणी भाताची आधारभूत पध्दतीने शासनाने ठरवून दिलेल्या किमतीत केली जात आहे. नेरळ येथे नेरळ विविध कार्यकारी सोसायटी तर कर्जत आणि कडाव येथे कर्जत खरेदी विक्री संघ यांना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी अधिकार दिले आहेत. नेरळ सोसायटीकडे भात देण्यासाठी तब्बल 1100 शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.त्यामुळे किमान 30000 क्विंटल भाताची खरेदी या केंद्रावर होण्याची शक्यता आहे. परिणामी कळंब-पोशिर भागातील शेतकरी यांना भाताची ने-आण करायला लागू नये यासाठी कळंब येथील गोदामात ठेवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र, कळंब येथील गोदामात भात साठवून ठेवण्याची तयारी केली आहे. त्यासाठी वजन काटा आणि मजूर यांची तयारी नेरळ विविध कार्यकारी सोसायटी यांनी केली आहे. मात्र, कळंब येथील गोदामात 2021च्या हंगामात खरेदी केलेले भात मार्केटिंग फेडरेशनने अद्याप उचलून नेले नाही. त्यामुळे कळंब येथील गोदाम जुन्या भाताने पूर्ण भरले आहे. परिणामी, तेथे भाताची साठवण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही आणि म्हणून भाताची खरेदी नेरळ सोसायटीला करता येत नाही.याबाबत नेरळ सोसायटी कडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला लेखी पत्र देऊन जुन्या हंगामातील भाताची उचल तात्काळ करावी, अशी मागणी केली आहे.

Exit mobile version