गुळसुंदे ग्रामपंचायतीला मिळाले एमआयडीसीचे शुद्ध पाणी
| रसायनी | वार्ताहर |
रसायनी परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अखेर निकाली निघाला आहे. येथील लाडीवली आदिवासी वाडी, लाडीवली गाव, आकुलवाडी, गुळसुंदेसह इतर वाड्यांना एमआयडीसीकडून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने येथील महिलावर्गात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

मागील 19 वर्षे रायगड जिल्हा परिषदेच्या चावणे पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद व जीर्ण अवस्थेत असल्याने पाताळगंगेचा अशुद्ध पाणी प्रक्रियेविना येथील नागरिकांना पुरविला जात होता. सन 2020 ला जागतिक महिला दिन साजरा करीत असताना लाडिवली गावातील महिला आणि आदिवासी बांधवांनी संकल्प केला आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पाठपुराव्याला सुरुवात केली. आवश्यक कागदोपत्री दस्ताऐवज पुरविण्यासही टाळाटाळ करण्यात आली; परंतु त्या विरोधालाही न जुमानता या महिलांनी मोर्चे, आंदोलने केली, तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही म्हणून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यातील बारा महिलांनी आमरण उपोषणासारखा हत्यार उपसून मागील तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत एमआयडीसीचे कनेक्शन मिळविले आणि जलजीवन मिशनमधून एक कोटी 26 लाख रुपयांचा निधीही मंजूर करून घेतला. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता रा.जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अभियंतांच्यामागे लागून योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आणि अखेर शनिवारी (दि.25) पासून गुळसुंदे ग्रामपंचायतीमधील लाडीवली, गुळसुंदे, आकुळवाडी, चिंचेचीवाडी, डोंगरीवाडी, फलाटवाडी, लाडीवली आदिवासी वाडी येथील नागरिकांचा अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठ्यापासून मुक्तता देत एमआयडीचीच्या शुध्द पाणी पुरवठ्यास सुरुवात केली. शनिवारी (दि.25) कोणताही गाजावाजा न करता रा.जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मिटकरी आणि लाडिवलीतील महिलांनी या पाण्याचा शुभारंभ केला.

यावेळी लाडीवलीतील गावकर्यांनी दाखवलेल्या एकीमुळेच हे शक्य झाल्याचे सांगत रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. एमआयडीसीचे शुध्द पाणी आणण्यासाठी रणरागिणी विजया मांडवकर, सुरेखा वाघे, राजेश्री म्हामंनकर, ज्योती पाटील, राजेश्री भोसले, निता वाघे, आशा शेडगे, रेखा कालेकर, सविता पवार, मानसी वाघे, प्रशाली शेडगे, दर्शना म्हामनकर आदींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तर, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी लाडीवली गावातील आणि आदिवासी वाडीतील माता भगिनींचां संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरेल, असे मत संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले.