रानसई धरणाची पातळी खालावली

उरणला पाणी टंचाईच्या झळा; नागरिकांचे आर्थिक बजेट कोळमडले

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील पावणेदोन लाख लोकसंख्येच्या 26 ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. त्यामुळे 30 जुनपर्यंत पुरेल इतकाच धरणात पाणीसाठा आहे. उरण तालुक्यातील नागरिकांसह आदीवासी वाड्या वस्त्यांना दोन दिवस पाणी कपातीबरोबरच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या मिनरल वॉटरच्या बाटल्या व टँकर विकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पाण्यावरील अतिरिक्त खर्चाच्या भारामुळे मात्र लग्नसोहळे साजरे करणाऱ्या वधु-वर पित्यांबरोबरच नागरिकांचेही आर्थिक बजेट कोळमडले आहे.

उरण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीमधील गावांना रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो. मात्र फेब्रुवारी-मार्च महिन्यापासुनच तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईने ग्रासले आहे. करंजा गावातील नागरिकांना पाण्यासाठी 12 ते 15 दिवस प्रतिक्षा करावी लागते. सुमारे 17 हजार लोकसंख्या असलेल्या केगाव ग्रामपंचायतीतील गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच, चिरनेर व रानसईतील अनेक आदिवासी वाड्याही तहानलेल्या आहेत. परिसरात असलेल्या विहीरी, तलाव आणि बोअरवेल यांनीही तळ गाठल्याने गरजे इतक्या पाण्यासाठीही विशेषतः महिलांवर मिळेल तेथुन पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये याआधी दोन-तीन दिवसाआड मिळणारे पाणी आता 8 ते 10 दिवसांनंतरही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे सध्या तरी पाणी टंचाईमुळे गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पाण्यासाठी विविध समारंभाबरोबरच आणि इतर कार्यक्रमांनाही फाटा देण्याची पाळी नागरिकांवर येऊन ठेपली आहे. पाणी टंचाईमुळे अनेकांनी कर्ज काढून बोअरवेलचा खार्चिक पर्याय निवडला आहे. मात्र, अनेक बोअरधारक बोअरवेलचे पाणी पिण्यालायक नसल्याने वॉटर प्युरीफाईट किंवा किमान तहान भागविण्यासाठी मिनरल वाटरचा वापर करु लागले आहेत. मिनरल वॉटरच्या एक लिटर बॉटलसाठी 15 ते 20 तर 20 लिटरच्या प्लास्टिक बॉटलसाठी 50 ते 60 रुपये अतिरिक्त खर्च करण्याची वेळ पाणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांवर येऊन ठेपली आहे. लग्नसराईसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मिनरल वॉटर आणि टँकरवर पाण्यासारखा खर्च करण्याची वेळ गरीब वधु-वर पित्यावर येऊन ठेपली आहे. या अतिरिक्त खर्चामुळे त्यांचे आर्थिक बजेट पुरते कोलमडले आहे. तालुक्यातील करंजा, चाणजे व केगावमध्ये तर 15-15 दिवसही पाणी मिळत नाही. या दोन गावांप्रमाणेच तालुक्यातील इतर काही गावांमध्येही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पुनाडे 10 गावातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे.

उरण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची खालावलेली पाण्याची पातळी, विहिरी, तलावांनी व बोअरवेलनेही गाठलेला तळामुळे पाणी टंचाईची संकट वाढतच चालले आहे.त्यातही सातत्याने वीज गुल होण्याच्या वाढते प्रकार आणि दिवसेंदिवस चाललेल्या उष्म्याच्या पारामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना आणखी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रानसई धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. धरणात काटकसर करूनही फक्त 30 जुनपर्यंतच पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी याआधीच आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार असे दोन दिवस पाणी कपात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्तही नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने, नियोजन करून करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

– ज्ञानदेव सोनावणे, उप अभियंता, उरण एमआयडीसी

उरण तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

– डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण

Exit mobile version