| रेवदंडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात विहूर गावाजवळ एक गंभीर प्रकार घडला. बोरिवलीहून मुरुडकडे येणाऱ्या एसटी बसचे उजव्या बाजूचे मागचे दोन्ही टायर धावत्या बसमधून अचानक सुटले आणि एकच खळबळ उडाली. यावेळी बसमध्ये अनेक प्रवासी होते. त्यामुळे क्षणभरासाठी प्रवाशांचे जीव टांगणीला लागले होते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या बेपर्वा कारभाराचा आणि लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेचा चव्हाटा पुन्हा एकदा उघड झाला आहे.गंभीर बाब म्हणजे धावत्या गाडीतून टायर सुटणे ही कुठली छोटी घटना नाही. ती मेंटेनन्स, तपासणी आणि सुरक्षेच्या बाबतीत झालेल्या भयानक हलगर्जीपणाची सजीव साक्ष आहे. रायगड जिल्ह्यात सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या तिन्ही पक्षांचे आमदार, खासदार आणि मंत्री आहेत. तरीदेखील सार्वजनिक वाहतुकीकडे होणारे दुर्लक्ष धक्कादायक आहे. बस अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, महाड-दापोली रोडवरील निसरड्या रस्त्यांमुळे नुकतेच एसटी अपघाताचे प्रकार घडले आहेत. ही घटना त्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे.






