। आगरदांडा । प्रतिनिधी ।
गणेशोत्सव अवघ्या एका महिन्यावर आला असून गणपती कारखान्यांमध्ये लगबग सुरू आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाले असून मूर्तीना रंगकाम करण्यात कारागीर व्यस्त असून मूर्तिकारांचे लक्ष बाप्पाच्या डोळ्यांवर खिळले आहे. सुबक आखणी, हिरे, मोती वापरून मूर्तीला सजवण्यात मूर्तिकार गढून गेले आहेत.
दिवस कमी, कारागिरांची कमतरता, विजेचा लपंडाव कारखानदारांना सतावत असल्याने कारखान्यांमध्ये दिवसरात्र काम सुरू आहे. गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असलेल्या मूर्तीची आगावू नोंदणी कारखानदारांकडे केली आहे. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. मागील तीन महिन्यांपासून कारखान्यांमध्ये गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत गणपतीच्या कच्च्या मूर्ती तयार करून त्या सुकवण्याचे काम करण्याकडे कारखानदारांनी लक्ष दिले. सद्यस्थितीत कारखान्यांमध्ये कच्च्या मूर्तीना रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कच्च्या मूर्तीना रंग देण्याबरोबरच सुबक नेट-नेटकी आखणी करण्याकडे मूर्तिकारांचे बारीक लक्ष आहे. याचबरोबर रंगकाम पूर्ण झाल्यानंतर हिरे, मोती, झिंग वापरून मूर्तीला आकर्षक बनवण्यात येत आहे. उत्सव एक महिना शिल्लक राहिल्याने वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान कारखानदारांसमोर आहे.
यंदा वाढत्या महागाईमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ होणार असुन त्याचा फटका गणेशभक्तांवर पडणार आहे. मूर्त्या बनविण्यासाठी लागणार्या शाडुच्या मातीच्या किंमतीत अगोदरच दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. रंग साहित्य व अन्य साहित्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. मजुरीच्या दरात वाढ झाली असली तरी मजुर मिळणे कठीण झाले आहे.
कोकणातील भक्तगण गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतात. शेकडोच्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावाकडे परतत असतात व मनोभावे पूजा व भजनात तल्लीन होऊन पुन्हा कामाच्या परतीकडे प्रवास करीत असतात. कोकणात हा सण खूप महत्वाचा असून महागाईकडे दुर्लक्ष करून हा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यात समस्त नागरिक तल्लीन होत असतात. मुरुड तालुक्यात 90 गणपती कारखाने आहेत. या कारखान्यात 8 ते 9 हजार गणपती बनवले जातात, ते पण शाडुच्या मातीने बनवले जातात. यामुुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत नाही. विसर्जनावेळी गणपतीचे विसर्जन पुर्णतः होते.