प्रवाशांची मोठी गैरसोय
| उरण | वार्ताहर |
नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या उरण-खारकोपरवरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम अर्धवट स्थितीत रेंगाळत पडलेले आहे. त्यामुळे जासई, चिर्ले परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी, गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम जलद गतीने सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कामगार नेते संतोष घरत यांनी केली आहे.
उरण हा मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रगतीशील तालुका आहे. या तालुक्याला मुंबई शहरातील उपनगरांतील शहरांना जोडणारा उरण-खारकोपर नवी मुंबई हा रेल्वे मार्ग नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाला आहे. आज उरण शहराकडे रेल्वे सेवा धावली असली तरी उरण-खारकोपर या रेल्वेच्या उपनगरावरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम हे रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे जासई, चिर्ले परिसरातील प्रवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी सदर रेल्वे स्थानकाचे काम जलदगतीने सुरू करावे, अशी मागणी संतोष घरत यांनी केली आहे.
