| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यााजवळ प्रवाशांना किल्ल्यात चढ- उतार करण्यासाठी बांधण्यात येणार्या जेट्टीचं काम सुरू होते. मात्र, हे काम सध्या बंद असल्याने पर्यटकांनी नाराजी दर्शवली आहे.
ऐतिहासिक जंजिरा हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी शिडाच्या बोटीतून पर्यटकांना ने-आण केली जाते. किल्ल्याजवळ पोहोचताच प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे बोटी हेलकावे खात असल्याने बोटीतून उतरताना मोठी कसरत करावी लागत आहे. काही पर्यटक तर उतरताना गंभीर जखमी झाले आहेत. यांची दखल घेत शासनाने सागरमाला योजनेंतर्गत किल्ल्याच्या पश्चिमेकडे जेट्टी बनवण्याची 93 कोटी 56 लाख रुपये निधी पुरातत्व विभागाने मंजुरी दिली. हे काम किल्ल्याचा मुख्य प्रवेश पश्चिमेला असल्याने पुरातत्व विभागाने व तज्ज्ञांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या अधिकार्यांसह पाहणी करून समुद्राच्या लाटांची तीव्रता पाहून 500 पर्यटक सुरक्षित उतरतील, अशी भव्य जेट्टी गेल्यावर्षी बनविण्यास सुरुवात केली होती. हे काम प्रगतीपथावर असताना गेले नऊ महिने ते थांबल्याने सर्वांनाच यांचा धक्का बसला आहे. लवकरात लवकर जेट्टीचे काम सुरू करा, अशी मागणी पर्यटकांसह सर्वच स्थरावर होत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई उपअभियंता दीपक पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पावसाळ्यात जेट्टीचं काम बंद होत. सध्या किल्ल्याजवळील जागेवर कोणतेच काम नसले तरी जेट्टीसंदर्भातले कास्टिंगचे काम दिघीजवळील पेट्रोल पंपाजवळ सुरू आहे. जेट्टीला लागणारे साहित्य दिघी जेट्टीजवळ आणण्याचं काम सुरू आहे. आता फक्त ब्राँझ व क्रेन लागणार आहे. ते जागेवर आलं की, कामाला सुरुवात केली जाईल. हे काम 31 मार्चच्या आत पूर्ण होणार आहे.
किल्ल्याजवळील दगडी जेट्टीवर पहिले सिमेंट काँक्रिकरण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर किल्ल्याच्या दरवाजाच्या बाजूला ओट्यापासून 40 मीटर लांबीचा अॅल्युमिनियमचा स्टँड बसवणार आहोत. या स्टँडवरून प्रवाशांना किल्ल्यात जाता येणार आहे, अशी प्रतिक्रिया मेरीटाईम बोर्ड मुंबई उपअभियंता दीपक पवार यांनी दिली.







