आठ दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास सावळे कार्यालयाला ठोकणार टाळे
| नेरळ | वार्ताहर |
गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या सावळे ग्रामस्थांना भेडसावत आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार करूनही कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही. आश्वासनांखेरीज ठोस उपाययोजना न केल्याने सोमवारी (दि. 10)सकाळी 11 वाजता गावातील शेकडो महिलांचा उद्रेक पाहायला मिळाला. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी आपला मोर्चा वळवत येत्या आठ दिवसांत ही समस्या न सुटल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात कडाक्याच्या उन्हाचे चटके लागायला सुरू झाली असताना अजून पाणीटंचाईला बराच वेळ असताना सावळे गावात मात्र महिलांना आताच हा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून अनियमित पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेकदा याबाबत तक्रार करूनही प्रशासनाने याविषयी कुठलीच कारवाई न केल्याने आज महिलांचा संताप पहायला मिळाला. महिलांनी आपला मोर्चा थेट कार्यालयात वळवला व शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला. सध्या या ग्रुप ग्रामपंचायतीवर प्रशासकराज सुरू आहे.
या ग्रामपंचायतीसाठी जलजीवन योजनेचे काम सुरू असून, आजपर्यंत ते काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. जुन्या योजनेतून अनेक फार्म हाऊसला परस्पर नळ कनेक्शन दिल्याने गावात येणार्या लाईनला आवश्यक पुरवठा मिळत नसल्याने महिलांना विहिरीवरून पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागते. पण, आता विहिरीतील पाणीसुद्धा आटले असून, पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत आहे. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी अनेकदा विनवणी करूनही पाण्याची समस्या जैसे थेच आहे. म्हणून आज सर्व महिला एकवटल्या आणि त्यांचा उद्रेक पहालया मिळाला. यासंदर्भात विशाल दळवी, संदीप धुळे, दशरथ दळवी, पंडित धुळे, रमेश धुळे, ताराबाई माळी, वर्षा धुळे, रखुमाई धुळे, अर्चना धुळे, मनीषा धुळे, कविता मोडक, अनिता धुळे, लताबाई धुळे आदींनी स्वाक्षरी करत पंचायत समिती गटविकास अधिकारी, तहसीलदार यांस पत्र दिले आहे.
जलजीवन योजनेचे काम सुरू असून, आजपर्यंत ते काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. जुन्या योजनेतून अनेक फार्म हाऊसला परस्पर नळ कनेक्शन दिल्याने गावात येणार्या लाईनला आवश्यक पुरवठा मिळत नाही. महिलांना विहिरीवरून पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागते. पण, आता विहिरीतील पाणीसुध्दा आटले असून, पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत असून, ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी.
रोहिदास धुळे,
ग्रामस्थ, सावळे
गावासाठी जलजीवन मिशन योजनचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु, ठेकेदाराने ही योजना पूर्ण केली नाही. परंतु, जुन्या टाकीत पाणी टाकून लवकरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
अनिल राठोड,
ग्रामसेवक, सावळे