| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील काशीद येथील 30 आदिवासी कुटुंबांना अंतोदय योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील रेशनकार्ड प्रदान करण्यात आले. आदिवासी समाज हा गरीब व अशिक्षित असल्याने मुरुड तहसील कार्यालयातून स्वतः मेहनत घेत यांची कागदपत्रे जमा करून त्यांना काही दिवसातच रेशनकार्ड देण्यात आली आहेत.
काशीद ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राणे यांनी यासाठी विशेष मेहनत घेत सर्व आदिवासी बंधूंना एकत्रित करून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. रेशनकार्डमुळे जे फायदे होणार आहेत, ते सांगितले. त्यांच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळाला. सदरील रेशन कार्ड वितरण समारंभ काशीद ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला.
यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, पुरवठा अधिकारी निखिल तनपुरे, सरपंच संतोष राणे, ग्रामविकास अधिकारी सुशांत ठाकूर, सदस्य दिपेश काते, दिया कासार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार रोहन शिंदे यांनी प्राप्त रेशन कार्डचा उपयोग धान्य मिळवण्यासाठी तसेच इतर शासकीय योजनांसाठी घेण्यात यावा. काशीद येथील आदिवासी लोकांना रेशन कार्ड मिळण्यासाठी सरपंच राणे यांनी उत्तम सहकार्य केल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी सरपंच राणे यांनी सर्व आदिवासी समाजाने रेशनकार्डचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा, आपले रेशनकार्ड इतर कोणालाही देऊ नका ते जपून व सुरक्षित वापरण्यास सांगितले. या समारंभास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.