सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्यास सुरुवात
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेवरील कर्जत एंडकडील नेरळ स्थानकात सुस्थितीत असलेला पादचारी पूल तोडण्याचे काम मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून सुरु आहे. नेरळ स्थानकात मध्य रेल्वेकडून पैशाचा चुरडा या चांगल्या स्थितीतील पादचारी पूल तोडून टाकण्यात येत आहे. नेरळ स्थानकात मध्यभागी असलेला हा पादचारी पूल प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या स्थानकात ब्रिटिशकाळात बांधण्यात आलेला पादचारी पूल 100 हून अधिक वर्षे उभा होता. मात्र, पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी कसा होतो आणि सरकारी पैशाची दळपट्टी कशी होते, याची चौकशी रेल्वेमंत्र्यांनी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मुंबई-पुणे या मेन लाईनवरील कर्जत एंडकडील नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीमधून पादचारी पूल बांधण्यात आला होता. त्यावेळी तो पादचारी पूल नेरळ स्थानातील एकमेव पादचारी पूल होता. नंतर मुंबई दिशेकडे तीन वर्षांपूर्वी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला. तो पादचारी पूल झाल्याने एका पादचारी पुलावर होणारी गर्दी विभागली होती. आता याच पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या पलीकडे नवीन पादचारी पूल मध्य रेल्वेकडून बांधण्यात आला आहे. तो पादचारी पूल आता तयार झाला असून, प्रवासी वाहतूक खुला झाला आहे.
मात्र, अवघ्या दोन दिवसांनी पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल तोडण्याचे काम सुरु आहे. रेल्वेकडून लाखो रुपयांचा निधी खर्चून बांधलेल्या पादचारी पुलाला लगेच निकामी ठरवण्यात आल्याने प्रवासीवर्गात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अगदी सुस्थितीत असलेला आणि मागील महिन्यात रंगरंगोटी करण्यात आलेल्या पादचारी पुलाला निकामी ठरवण्यात आल्याने त्या पुलाच्या उभारणीसाठी करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे पूल बांधण्याच्या कामातील अभियंत्यांची चौकशी रेल्वे मंत्र्यांनी करायला हवी. दुसरीकडे याच नेरळ स्थानकात ब्रिटिशकाळात उभारण्यात आलेला पादचारी पूल तब्बल 100 वर्षे टिकला होता आणि पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी होतो, याचा शोध रेल्वेमंत्र्यांनी लावण्याची गरज आहे.