लाडवली पुलाचे काम रखडले

रायगड महामार्गावर ग्रामस्थांनी केले आंदोलन

। महाड । वार्ताहर ।

महाड-रायगड या नव्या महामार्गावरील लाडवली येथील पुलाचे बांधकाम रखडल्याने रायगड किल्ल्यासह चाळीस गावांचा वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी सोमवारी दुपारी लाडवली पूल येथे तीव्र आंदोलन केले.

याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात येणार आहे. महाड ते रायगड किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण करून नवा राष्ट्रीय महामार्ग तयार केला जात आहे. या मार्गावर असणारा लाडवली येथील जुना पूल नव्याने बांधकाम करण्यासाठी तोडण्यात आला आहे. मात्र नियोजित वेळेत नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्यास या भागातील वाहतूक पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. या मार्गावरून रायगड किल्ल्यासह सुमारे 40 गावांचा प्रवास सुरू असतो.

सध्या पावसाळी दिवस असल्याने पूल पूर्ण न झाल्यास नागरिकांना अनेक गैरसोयीच्या सामना करावा लागणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवासही अडचणीचा ठरणार आहे. 20 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा असून पुलाचे बांधकाम न झाल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. काम वेळेत न सुरू झाल्याने अखेर लाडवली येथे ग्रामस्थ, या भागातील अनेक प्रवासी रस्त्यावर उतरले. पोलिस उपअधीक्षक शंकर काळे यांनी भेट दिली. महामार्ग विभागाचे जबाबदार अधिकारी या वेळी गैरहजर होते. आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नगरपालिकेकडे तक्रार दाखल केली. याबाबत प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन काय उपाययोजना करता येईल, यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे.

Exit mobile version