| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील नारवेल बेनवले ही 16.44 किलोमीटरच्या खारभूमी बंदिस्तीचे काम वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने वर्षाभरापूर्वी सुरु झाले. मात्र, या कामाच्या दर्जाविषयी वारंवार तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या साटेलोट्यामुळे व राजकीय वरदहस्तेमुळे कामाच्या योग्य दर्जाबाबत मुलाहिजा राखला गेला नाही. ठेकेदाराला वाटले त्याप्रमाणे त्यांनी काम केले. शासनाने घालून दिलेल्या इस्टीमेंटप्रमाणे (अंदाजपत्रक) काम केले गेले नाही. कोणी तक्रार करायला गेल्यास ठेकेदारांच्या माणसांकडून खाकीची भीती घातली जायची व आवाज उठवणार्यांचा आवाज दाबला जायचा. त्यामुळे ठेकेदार मन मानेल तसे काम करत सुटला. शेवटी 16.44 किलोमीटरमधील केलेल्या कामामधील काम एवढे निकृष्ट दर्जाचे होते की, केलेले काम खाडीमध्ये वाहून गेलेले आहे.
या कामासाठी वर्ल्ड बँकेकडून 51,76,22,410 रुपयांचा निधी उपलब्ध झाली आहे. बारा महिने उलटून गेले तरीदेखील निम्म्यापेक्षा काम शिल्लक आहे. तर, केलेले काम वाहून गेले आहे. नारवेल बेनवले या खारबंदिस्तीमध्ये नऊ मोर्यांचे काम मंजूर आहे, मात्र त्यातील दोनच मोर्यांचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच या कामाची मुदत ही 18 महिन्यांची आहे. त्यातील 12 महिन्यांहून अधिक काळ निघून गेलेला आहे. मग उरलेले काम शिल्लक मुदतीत कसे पूर्ण होईल, हा ही मोठा गहण प्रश्न आहे. केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने ते वाहून गेले आहे. तसेच केलेल्या कामामध्ये दगडाची पीचिंग वरच्या थराला मुरुम, पीचिंगच्या बाजूने मुरुम टाकणे गरजेचे असताना असे केले गेलेले नाही. तसेच ज्या काही ठिकाणी दगड म्हणून वापरले गेले आहे, तेदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या दगडांचाही काही उपयोग झालेला नाही.
वर्ल्ड बँकेने खारबंदिस्तीचे काम योग्य प्रकारे व्हावे म्हण्ाून जवळपास 52 कोटींच्या आसपास निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, या निधीचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले आहे. जर नारवेल बेनवले या बंदिस्तीचे काम योग्य प्रकारे झाल्यास पेण तालुक्याचे भाताचे कोठार पुन्हा भरल्याशिवाय राहणार नाही. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पूर्ण बांधच भरती-ओहोटीच्या पाण्याने वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहे. दुर्दैवाने ही खारबंदिस्ती फुटल्यास पूर्ण खारेपाट जलमय झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु, याची तमा ना ठेकेदाराला आहे, ना शासनाच्या अधिकार्यांना आहे. या शासनाच्या अधिकार्यांच्या उदासीन धोरणामुळे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. तरी या कामाचे ठेकेदार प्रथमेश काकडे यांची रितसर चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
खाकी-खादी व सफेद पोश अधिकार्यांच्या साटेलोट्यामुळे नारवेल बेनवले बंधिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे – खारेपाट ग्रामस्थ
नारवेल बेनवले या बंदिस्तीमुळे खारेपाटाला सुगीचे दिवस येतील, पुन्हा एकदा पेण भाताचे कोठार तुडुंब भरेल; परंतु खाकीवाले आणि खादीवाल्यांचे ठेकेदार जावई असल्याप्रमाणे त्याला वागणूक मिळत आहे. तर, अधिकारी वर्ग डोळे मिटून कामाचा दर्जा न बघता सह्या मारत आहेत. स्थानिक ग्रामस्थ कामाला विरोध करायला गेल्यास खाकीवाले दंडुका दाखवतात. तर, खादीवाल्यांच्या दारात गेल्यास तुमच्या मतांची गरज नाही, अशा प्रकारची उत्तरे भेटतात. आणि, सफेद पोश अधिकारी काम उत्तम सुरू आहे, काम दर्जेदार सुरू आहे, कामातील शास्त्रसुद्धा तुम्हाला माहिती आहे का, अशा प्रकारे दरडावतात. त्यामुळे ग्रामस्थांची अवस्था एकीकडे आड, दुसरीकडे विहीर अशी झाली आहे. वर्ल्ड बँकेने काम उत्तम व्हावे म्हणून निधी दिला आहे. परंतु खाकी, खादी, सफेद पोश या त्रिकुटाच्या मेहरनजरीमुळे मन मानेल तसे ठेकेदार काम करत आहे. यामध्ये कांदळवनांची तोडदेखील होत आहे. याकडेदेखील वनखात्याचे दुर्लक्ष आहे. एकंदरीत, 16 मीटरच्या खारबंदिस्तीचे काम हे निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रकापेक्षा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.