| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे नगरीत इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा अस्तित्वात असतानाच येथील केएमजी विभागाचे प्रवेशद्वार असलेल्या चौक परिसरात ग्रामपंचायतीकडून सुशोभित करण्यात आलेले प्रभू श्रीराम कुंड उद्या, गुरुवार (दि. 26) सकाळी 10.30 वा. पासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.
नागोठणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाला रोल मॉडेल नागोठणे करण्याच्या संकल्पनेत एक नवी भर टाकण्याचे काम म्हणून गावातील तीन ऐतिहासिक तलाव अर्थात शृंगार तलाव, कौंडाल तलाव आणि मशिदीचा तलाव यांचे नियोजित सुशोभिकरण सुरू आहे. असे असतांनाच गावातील ऐतिहासिक असे परंतु वर्षानुवर्षे भग्नावस्थेत असलेले प्रभू श्रीराम कुंडचे व राम मंदिरामध्ये पूजेसाठी ज्या वाटिकेतून फुले नेली जायची त्या परिसराचे सुशोभिकरण याचे काम पूर्ण झाले आहे. किशोर जैन यांच्या मार्गदर्शनानुसार नागोठण्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच रंजना राऊत, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण झाले आहे.