काडेपेटीएवढया शेकापचे काम पेटारेएवढे- माजी आ. पंडित पाटील

कुरकोंडी कोलटेंभी येथे सायकल वाटप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाने मोठया प्रमाणावर विकासकामे केली आहेत. जिल्ह्यात शिक्षण संस्था, डीएड कॉलेज, मेडीकल कॉलेज शेकापनेच काढले. कित्येकांना रोजगार उपलब्ध करुन दिले. अनेक लोकं घडवली. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष काडेपेटी एवढा असला तरी त्याचे काम पेटारेएवढे असल्याचे उद्गार शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी काढले.

शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या सीएफटीआय या संस्थेच्या वतीने कुरकोंडी कोलटेंभी येथे विद्यार्थींनींना सायकल वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य भावना पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, गावकीचे अध्यक्ष सुरेश पाटील, शेकापच्या अलिबाग तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा माजी सरपंच प्रिती पाटील, उपाध्यक्ष रोशनी पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात कुरकोंडी, कोलटेंभी, चरी, तीनविरा, रायंदे, पळी, तोरणपाडा, आंबेघर या गावातील सावित्रीच्या लेकींना सायकलींचे वाटप करण्यात आले.

पंडित पाटील मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, कोकण एज्युकेशन संस्थेची स्थापना करण्यात आल्यानंतर त्या माध्यमातून स्व. दत्ता पाटील, स्व. प्रभाकर पाटील यांनी गोरगरीबांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम केले. तेच काम पुढे जयंत पाटील, मीनाक्षी पाटील यांनी चालु ठेवले. आज त्यांचाच वारसा चित्रलेखा पाटील या चालवित आहेत. शिक्षणसंस्थेसोबतच सायकल वाटप करुन त्यांनी खर्‍या अर्थाने शिक्षणाला गती देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सायकलींमुळे बंद पडत असलेले सायकल दुरुस्तींची दुकाने पुन्हा सुरु होऊन रोजगार निर्मीती देखील होईल असेही ते म्हणाले. शेकापक्षाचा आमदार म्हणजे सर्वसामान्य आमदार असतो. कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा संकटात शेकापक्षाच्या शिलेदारच जनतेपर्यंत मदत घेऊन पोहचत होते. चित्रलेखा पाटील यांनी खूप मोठया प्रमाणात या काळात मदत केल्याचे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. खोटे बोलणे सोपे पण काम करणे कठीण आहे. शेकापक्षाने कधीच लोकांची फसवणूक केली नाही आणि दलाली देखील केलेली नाही असेही पंडीत पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी शेकापक्षाच्या अलिबाग तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रिती पाटील तसेच उपाध्यक्ष रोशनी पाटील यांनी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्य स्तरीय क्रीडा नैपुण्य मिळविणार्‍या ॠतुराज पाटील याचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. सुत्रसंचलन विनायक पाटील यांनी केले.

गरजूंसाठी घरकुल योजना राबविणार; चित्रलेखा पाटील यांची घोषणा
आज सर्वसामान्यांसाठी तीन गोष्टी हक्काच्या आहेत, त्या म्हणजे पक्के घर, अन्न आणि शिक्षण हे सर्वांना मिळायलाच पाहिजे. त्यादृष्टीने आपण गरजूंसाठी घरकुल योजना राबविणार असून या माध्यमातून काकळघर येथे 20 घरे बांधून देणार असल्याची घोषणा शेकाप महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केली. ही घरे बांधुन देतानाच स्थानिक गरजू जनतेलाच दोन लाख रुपयांची घरे बांधुन देणार असल्याचे त्यांनी नमुद केले. त्या पुढे म्हणाल्या की, महापुरुषांना हार तुरे घालण्यापेक्षा त्यांचे विचार कृतीत आणण्याची जास्त गरज आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच माझ्या सारख्या महिलांची प्रगती शक्य झाली आहे. शेकापक्षाची बांधीलकी ही सर्वसामान्य कष्टकरी जनतेला शिक्षण, न्याय देणे ही आहे, किती काही झाले तरी आमची ही बांधीलकी आम्ही विसरणार नाही अशी ग्वाही यावेही चित्रलेखा पाटील यांनी दिली.

सीएफटीआयच्या वतीने फक्त रायगड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील काही भागात देखील सायकल वाटप करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यात देखील सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. शेकापचे अंतिम ध्येय हे अलिबाग आणि रायगडचा विकास हेच आहे. टिका टिप्पणी करणे सोपे आहे पण काम करणे सोपे नाही. त्यामुळे आम्ही टिका टिपण्णी न करताना आमचे काम करत आहोत. शिक्षणात राजकारण नको तर सामाजिक कार्यक्रम समाजासाठी राबवून पहिले समाजकारण करण्याचा आमचा प्रयत्न असून आमचे समाजकारण पटले तर राजकारण आम्ही करु. काम करणारे कोण आहेत हे देखील जनतेने लक्षात ठेवले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version