तळा ग्रामीण रुग्णालयाचे काम अपूर्णावस्थेत

आरोग्य मंत्र्यांची माहिती,आ.जयंत पाटील यांनी वेधले लक्ष
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तळा (जि.रायगड) येथील ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांसह आरोग्य सुविधा सुरु कराव्यात,अशी मागणी आम.जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे. मात्र या इमारतीचे बांधकाम अपूर्णवस्थेत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ.तानाजी चव्हाण यांनी दिली आहे. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.जयंत पाटील यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित करुन आरोग्य मंत्र्यांकडे विविध प्रश्‍नांच्या माध्यमातून विचारणा केली.

त्यावर आरोग्य मंत्री डॉ.तानाजी चव्हाण यांनी लेखी उत्तरात मौजे तळा येथील ग्रामीण रुग्णालय बांधण्याकरीता मुख्य इमारतीसाठी रुपये 4 कोटी 50 लक्ष एवढया रक्कमेच्या बांधकामाच्या अंदाजपत्रक आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. सद्य:स्थितीत इमारतीचे बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच शासन निर्णयानुसार पदनिर्मिती करण्यात आली आहे. तथापि, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आलेले नाही.असे आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलेले आहे.

मुळ प्रश्‍नात आ.जयंत पाटील यांनी नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा तालुक्याच्या ठिकाणीच मिळाव्यात यासाठी तळा शहरात सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले असून या ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे साहित्य, यंत्रसामग्री उपलब्ध नसून, रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग मंजूर करण्यात आलेला नाही, तत्कालीन पालकमंत्री यांनी तळा ग्रामीण रुग्णालयात अधिकारी व कर्मचारी वर्ग मंजूर करून ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याचे आश्‍वासन तळावासी यांना दिले होते या घटनेस पाच महिन्यांचा कालावधी होऊनही तळा शहरातील ग्रामीण रुग्णालय बंद अवस्थेत आह याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

तळा प्राथमिक आरोग्य केंद्रातही पुरेशा प्रमाणात कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णालयात येणारे अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर महिला, सर्प दंश, विंचू दंश रुग्णांना प्रथमोपचार करून नजीकच्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत असून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना देखील मानसिक त्रास सहन करावा लागतो तसेच काही वेळा रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांच्या जीवितासही धोका निर्माण होऊन आरोग्याच्या बाबतीत तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे,असेही त्यांनी निदर्शनास आणले.

त्यांच्या या उपप्रश्‍नांवर आरोग्य मंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तळा, येथे एकूण 15 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 12 पदे भरलेली असून 3 पदे (कुष्ठरोग, तंत्रज्ञ, शिपाई, स्त्री परिचर) रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्यात येतात. तसेच आवश्यकतेनुसार पुढील संदर्भ सेवेसाठी त्यांना उपजिल्हा अथवा जिल्हा रुग्णालयास संदर्भित केले जाते.असे लेखी उत्तर दिले आहे.

Exit mobile version