दोन वर्षानंतरही कामाला गती नाही; पावसाळ्यात प्रवाशांच्या जीवाला धोका
। माणगाव । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कळमजे गावच्या फाट्यावर असणारा गोद नदीवरील पूल दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याने पावसाळ्यात या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळे या महामार्गावरून जाणार्या वाहनांना धोका होण्याचा संभव आहे. हा पूल कमकुवत असल्याने दरवर्षी अतिवृष्टीत शासनाकडून महामार्गावरील वाहतूक बंद केली जाते. मुंबईकडे जाणार्या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून निजामपूर मार्गे वाहतूक सुरु ठेवावी लागते. पावसाळा जवळ आल्याने या पुलाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने उपाययोजना आखणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नाही.
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव जवळ कळमजे गावच्या फाट्यावर गोद नदी असून या नदीवर ब्रिटीश कालीन पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून हा पूल दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीत या नदीला मोठा पूर येतो, त्यावेळी शासन या पुलावरून येणे जाण्यासाठी वाहतूक बंद करते. हा पूल धोकादायक असल्याने विशेषतः पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता आहे. या पुलाची उंची कमी असून पावसाळ्यात या पुलाला पाणी लागते. या नदीवर शासनांनी प्रवासी, वाहनचालकांना सावधगिरीचा उपाययोजना म्हणून दोन्ही बाजूंनी स्ट्रीट लाईट बसवणे, तसेच सूचना फलक लावणे गरजेचे आहे. ते बसवले नसल्याने पावसाळ्यात या पुलावरून जाणर्या वाहनांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
महाड सावित्री नदी येथील दुर्घटनेच्या आठवणी लक्षात घेऊन या नदीवरील पूल तातडीने उभारण्याकडे शासनांनी अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. येथील नवीन पुलाचे काम मंजूर होउन दोन वर्ष झाली, मात्र संबंधित ठेकेदाराने या कामाला म्हणावी तितकी गती दिलेली नाही. भविष्यात या महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल यासाठी शासनांनी या पुलाचे काम हाती घेऊन जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी येथील नागरीक व प्रवासी वर्गाकडून होत आहे. हा नवीन पूल बांधण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला असून या पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाची लांबी 35 मीटर तर रुंदी 16 मीटर असून उंचीही वाढवली जाणार आहे. यासाठी 6 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. परंतु, 10 दिवसांवर पाऊस आलेला असताना नदीच्या पायाभरणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी होण्याची अपेक्षा मावळली आहे.