ओसी नसतानाही इमारतींमध्ये हजारो कुंटुंब वास्तव्यास
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील इमारतींना वापर परवाना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी अद्याप मिळालेली नसतानाही हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. हे वास्तव्य कायदेशीर नसले तरी त्या रहिवाशांवर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. मात्र, महारेरा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सिडको अधिकार्यांबरोबर महारेरा यांचेही आर्थिक हितसंबध जपले जात असल्याची चर्चा सुरू आहे.
सिडकोच्या माध्यमातून उरणमध्ये द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे. लवकरच उरणपर्यंत रेल्वे येणार असल्याने बिल्डर लॉबीकडून इमारती उभ्या केल्या जात आहेत. परंतु, नोडमध्ये काही ठिकाणी सीआरझेड लागू करण्यात आल्याने इमारती उभ्या करण्यास अडचणी होत असतानाही काही बिल्डर नियमांची पायमल्ली करून बांधकाम करीत आहेत. त्यात आणखीन भर म्हणजे द्रोणागिरी नोडमधील नामवंत बिल्डरांकडून 10 ते 15 मजली आलिशान टॉवर उभे करण्यात आले आहेत. परंतु, काम पूर्ण होऊन इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी अद्याप मिळालेली नाही.
कोणतीही इमारत उभी केल्यानंतर त्यांना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच वापर परवाना (ओसी) मिळाल्याशिवाय इमारतींचा वापर करू शकत नाही. अशा प्रकारचे कडक निर्बंध असतानाही त्याचे उल्लंघन करून सर्रासपणे इमारतींमध्ये वास्तव्य व इतर सर्व सुखसोयी नियमाला बगल देत बिल्डरांनी ग्राहकांना दिल्या आहेत. तसेच, सीआरझेडचे खुलेआम उल्लंघन बिल्डरांकडून सुरू आहे. याबाबत बिल्डरांकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. उरणमधील द्रोणागिरी नोडमध्ये उभ्या रहाणार्या इमारत या ज्यांच्या अधिपत्याखाली सुरू आहेत, त्या संबंधित विभागांच्या अधिकारी वर्गाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, बांधकाम व्यावसायिकांना नियामकाकडे नोंदणी केल्याशिवाय प्रकल्पाची जाहिरात, विक्री, बांधकाम, गुंतवणूक करता येत नाही. नोंदणीनंतर, सर्व जाहिरातींमध्ये महारेराद्वारे प्रदान केलेला नोंदणी क्रमांक असणे अपरिहार्य आहे. एखादा बांधकाम व्यावसायिक अशा प्रकारे नोंदणी क्रमांक नमूद न करता जाहिरात करत असेल, तर त्यासंदर्भात महारेराकडे तक्रार करता येते. अशा बांधकाम व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई ममहारेराफ करू शकते.
उरणमध्ये वाढते औद्योगिककरणामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व रेल्वे लवकरच सुरू होणार असल्याने बिल्डर लॉबीकडून नियमांची पायमल्ली करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी याची सखोल चौकशी करावी. तसेच, द्रोणागिरी नोडमध्ये ज्या इमारतींना ओसी नसतानाही वापर सुरू आहे त्या इमारतीत भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यावर जबाबदार कोणाला धरणार, असा सवालही यानिमित्ताने उभा रहात आहे. तरी याची खबरदारी म्हणून ओसी नसलेल्या इमारतींवर व संबंधित बिल्डरवर ठोस कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.