मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम प्रलंबित

| नागपूर | प्रतिनिधी |

उरणच्या मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम प्रलंबित असून ते तातडीने पूर्ण केले जावे, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली.

पाटील यांनी सांगितले की, ज्या सागरी पोलीस ठाण्याची सन 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर निर्मिती करण्यात आली त्यात मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचा समावेश आहे. मात्र या इमारतीचे बांधकाम निधीअभावी चार वषापासून प्रलंबित आहे.त्यामुळे बांधकामाचा खर्च 86 लाखांवरुन आता सुमारे 1 कोटी 82 लाखांपेक्षा जास्त होणार आहे. पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे, याबाबत सरकारने काही चौकशी केली आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, जयंत पाटिल यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. मोरा सागरी पोलीस नवीन प्रशासकीय इमारत बांधकामांसाठी 21/2/2008 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रथम 24 लाख व 12 जानेवारी 2009 अन्वये रुपये 33.18 लाख दिनांक 12 जानेवारी 2011 अन्वये 86,47,952 असे रुपये 1,43,65,952/- इतका निधी सार्वजनिक बांधकाम विभागास उपलब्ध करण्यात आला होता. सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी 248.13 चौ.मीटर क्षेत्रफळासाठी तांत्रिक मान्यता प्राप्त झाली होती. तथापी प्रत्यक्ष बांधकाम करताना स्तभांच्या पायासाठी कठीण खड़क अंदाज पत्रकापेक्षा जास्त खोल गेल्या मुळे पायाच्या बांधकामांध्ये बरीच वाढ होऊन एकूण 425.90 चौ. मीटरचे बांधकाम करावे लागले.

तसेच सांडपाणी निचरा होणेकामी सेप्टीक टँक, पाणी साठविण्यासाठी जमिनी खालील पाण्याची टाकी, छतावर पाण्याची टाकी, छत गळती प्रतिबंधक उपाय योजना, छतावर पत्रा शेड, कुंपण – भींती व पेव्हर ब्लॉक आदी अंदाज पत्रका मध्ये समावेश नसलेली कामे करण्यासाठी एकूण 95.04 लाखाचे वाढीव अंदाज पत्रक अधीक्षक अभियंता, रायगड सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी तयार केलेला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

सदर वाढीव बांधकामाचा खर्च वाढल्याने निधी अभावी इमारत बांधकाम पूर्ण झालेले नाही. तसेच सदर उर्वरित वाढीव बांधकाम करणेसाठी लागणारा निधी उपलध करून देण्यात येईल असे फडणवीस यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे .

Exit mobile version