| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सुतार यांना निर्भीड पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार आर्यारवी एंटरटेनमेंटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार व संपादक सन्मान सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीमुळे माथेरानच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थितीत सत्याची बाजू निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकार, समाजसेवक आणि कलावंतांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून हा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांसह ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक-पाक्षिकांचे प्रतिनिधी तसेच डिजिटल न्यूज पोर्टलच्या संपादकांनाही या व्यासपीठावर सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात स्वाभिमान लेखणी, शब्दवेध गौरव, अजेय लेखणी, कलम-रत्न, कलागौरव, साहित्य-संस्कृती जीवनगौरव, विवेक-दीप, जनसेवा रक्षक आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार अशा विविध मानाच्या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि.12 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता मुंबई-दादर (पू.) येथील मराठी ग्रंथसंग्रहालात पार पडणार आहे.
लेखणी ठरली गौरवास पात्र
