देवाचा लग्न सोहोळा थाटात
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तळाघर येथील प्रसिद्ध स्वयंभू महादेवाच्या यात्रेला तसेच श्री शंभू महादेव आणी पार्वती मातेचा आगळा वेगळा विवाह सोहळा 6 व 7 एप्रिल रोजी संपन्न झाला. हर हर महादेवाच्या जयघोषात शुभ मंगलम सावधान म्हणत देवाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी तसेच दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली होती.
तळाघर येथील श्री तीर्थक्षेत्र स्वयंभू महादेव मंदीर हे बारा बलुतेदार आलुतेदार यांचे दैवत आहे. याठिकाणी रामनवमीच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता श्री महादेवाचे लग्न लागते. हे लग्न पाहण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी रोहा, मुरूड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा या ठीकानाहून लाखो भाविकांनी सहभाग घेतला होता. यावेळी देवाचा लग्न सोहळा पारंपारिक पद्धतीने धार्मिकविधी व मंगलाष्टके म्हणत पार पाडण्यात आला. या विवाह सोहळ्यात तालुक्यातील महादेवाडी येथील नवरदेव तर धाटाव गावची नवरी असते. दोन दिवस ही यात्रा सुरू असते. तसचे, पेशवे व सिद्धी यांच्यात झालेल्या करारात या यात्रेच्या लग्न सोहळ्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येते.
याठिकाणी निघणार्या मानाच्या देवकाठ्यांची पूजा मंत्री अदिती तटकरे व मा.आ. अनिके तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विनोद पशिलकर, विजय रावमोरे, संदीप तटकरे, समीर शेडगे,अनिल भगत, सुरेश मगर, शंकरराव भगत, ज्ञानेश्वर साळुंके, हरिश्चंद्र मोरे, विठ्ठल मोरे, विष्णू लोखंडे, संतोष माने, हरिश्चंद्र माने, गुणाजी पोटफोडे, अमित घाग, मनोज कुमार शिंदे, अमित मोहिते, सरपंच नथुराम माने यांसह परिसरातील नागरिक, बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, लग्न सोहळ्याला रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील उपस्थीत होते.
काठी नाचविण्याची परंपरा
या यात्रेत काठी नाचवण्याची परंपरा आहे. तालुक्यासह जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतून भव्य दिव्य अशा काठ्या येतात. त्या लग्न समारंभ होताच खालू बाजा, सनई, वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत नाचवून आनंद लुटला जातो. तर, लग्न सोहळ्याच्या दुसर्या दिवशी मोठी यात्रा भरते. या यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
यात्रेत लाखोंची उलाढाल
रामनवमीनिमित्त 2 दिवस भरलेल्या या यात्रेत लाखोंची उलाढाल होत असल्याने दिवसेंदिवस या यात्रेची व्याप्ती वाढतच आहे. या यात्रेत करमणूक म्हणून आकाश पाळणे, मौत का कुंवा, लहान मुलांसाठी खेळ व खेळणी, मिठाईची दुकाने, हॉटेल्स, आयस्क्रिम आदींचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होतो.