दुचाकीस्वार थोडक्यात बचावले
। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग-रेवस या राज्य मार्गावरील भाल गावानजिक एक भले मोठे वटवृक्ष पडल्याची घटना रविवारी (दि.6) दुपारच्या सुमारास घडली आहे. या मार्गाने प्रवास करणार्या एका दुचाकीवर हे झाड कोसळले असून, ते थोडक्यात बचावले आहेत. त्याचबरोबर या काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती.
अलिबाग-रेवस या मार्गाने प्रवास करताना एक दुचाकीस्वार भाल गावानजिक येताच त्यांच्या गाडीवर वडाचे झाड कोसळले. त्यामध्ये दोन दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने ते दोघेही थोडक्यात बचावले असून, त्यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती अलिबाग पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत वाहतूक कनकेश्वर फाटामार्गे वळविण्यात आली. अलिबाग पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तसेच थळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने काही तासात पडलेले झाड बाजूला करण्यात यश मिळविले. दरम्यान, रविवार असल्याने पर्यटक या मार्गाने अलिबागमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यांच्यासह स्थानिक वाहनचालक व नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.
या मार्गावर यापूर्वीही अनेक वेळा वृक्ष पडण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक प्रवासी व वाहनचालक थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे वेळोवेळी असे धोकादायक वृक्ष काढून टाकण्याची मागणी वाहनचालक व प्रवाशांतर्फे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा धोकादायक झाडांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाहनचालक व प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे.